पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी २९९ धावांचे आव्हान महाराष्ट्राच्या फलंदाजांना अतिशय सोपे असले तरी बेभरवशी फलंदाजीमुळे त्यांनी आसामविरुद्धच्या रणजी क्रिकेट सामन्यात स्वत:ला अडचणीत टाकले. दिवसअखेर त्यांची पहिल्या डावात ६ बाद १६० अशी दयनीय स्थिती झाली.

गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात आसामने ४ बाद २२३ धावांवर पहिला डाव पुढे सुरू केला. मात्र श्रीकांत मुंडे (४/६७) याच्या प्रभावी माऱ्यापुढे त्यांचा डाव २९८ धावांवर संपला. गोलंदाजांनी महाराष्ट्राच्या फलंदाजांपुढे सोपे आव्हान उभे केले तरीही महाराष्ट्राचे फलंदाज केवळ कागदावरच श्रेष्ठ आहेत याचा प्रत्यय पुन्हा आला. राहुल त्रिपाठी याने केलेल्या अर्धशतक व भारतीय संघाकडून खेळलेला केदार जाधव याच्या ३६ धावा हा अपवाद वगळता महाराष्ट्राच्या फलंदाजांनी आसामपुढे लोटांगण घातले. पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी त्यांना आणखी १३८ धावांची आवश्यकता आहे. सामन्याचा गुरुवारी शेवटचा दिवस आहे.
अरुण कार्तिक व गोकुळ शर्मा यांनी आसामच्या डावास आज पुढे प्रारंभ केला. मात्र आणखी ३२ धावांची भर घातल्यानंतर ही जोडी फुटली. त्यांनी पाचव्या विकेटसाठी १६२ धावांची भागीदारी केली. कार्तिक याने ४४३ मिनिटांत १३० धावा केल्या. त्यामध्ये त्याने १२ चौकार व एक षटकार अशी फटकेबाजी केली. गोकुळ याने ७६ धावा करताना ११ चौकार ठोकले. हे दोन फलंदाज बाद झाल्यानंतर आसामचा डाव गुंडाळण्यास महाराष्ट्रास वेळ लागला नाही.
महाराष्ट्राने स्वप्नील गुगळे (२७) व चिराग खुराणा (१०) या सलामीची जोडी पाठोपाठ संग्राम अतितकर (६) व अंकित बावणे (०) यांच्याही विकेट्स गमावल्या, त्या वेळी महाराष्ट्राची ४ बाद ६० अशी दारुण स्थिती झाली होती. त्रिपाठी व जाधव यांनी पाचव्या विकेटसाठी ६७ धावांची भर घातली व संघास सावरण्याचा प्रयत्न केला. त्रिपाठी याने नऊ चौकारांसह ५२ धावा केल्या. मोठय़ा डावाची अपेक्षा असलेल्या केदार याला केवळ ३६ धावांची खेळी करता आली. त्यामध्ये त्याने सहा चौकार व एक षटकार अशी फटकेबाजी केली. आसामकडून कृष्णा दास याने चार बळी तर धीरज गोस्वामी याने दोन गडी बाद केले. अरुण कार्तिक याने चार झेल घेत त्यांना चांगली साथ दिली.

रणजी क्रिकेट स्पर्धा

संक्षिप्त धावफलक
आसाम पहिला डाव १०५ षटकांत सर्वबाद २९८ (अरुण कार्तिक १३०, गोकुळ शर्मा ७६, श्रीकांत मुंडे ४/६७, समाद फल्ला २/५८, अनुपम संकलेचा २/५५, डॉमिनिक मुथ्थुस्वामी २/५६)
महाराष्ट्र पहिला डाव ५४ षटकांत ६ बाद १६० (राहुल त्रिपाठी ५२, केदार जाधव ३६, कृष्णा दास ४/५८, धीरज गोस्वामी २/४६)