दृश्य १ : अलीकडेच फिफा विश्वचषकात जपानचा सामना झाला. जपान संघाने हा सामना गमावला. स्वाभाविकच जपानचे चाहते नाराज झाले, पण तरीही चाहत्यांनी सर्वाची मने जिंकली. सामना संपल्यावर स्टेडियम स्वच्छ करण्याची परंपरा जपानमध्ये जपली जाते. त्यांच्या या सवयीमुळे आयोजक अतिशय प्रसन्न झाले होते.

दृश्य २ : दिवाळी संपली आणि बच्चेकंपनी पुन्हा क्रीडांगणाकडे वळू लागली. पण मुले मैदानात पोहोचली तर त्यांना तिथे दिसले दिवाळीत फोडण्यात आलेल्या फटाक्यांचा खच आणि सोबत अन्य कचरा. मैदान खेळण्याच्या लायकीचे राहिले नव्हते.

दुसरे दृश्य आपल्या एकूण सार्वजनिक चरित्राविषयी बरेच काही बोलून जाते. ‘जे जे सार्वजनिक ते कोणाचेच नव्हे’ अशी आपली वृत्ती बनल्याने आपल्याला मैदान खेळायला तर हवे, फटाके फोडायलाही हवे, परंतु त्याची देखभाल, स्वच्छता मात्र अन्य कुणी तरी करावी, अशी सगळ्यांचीच अपेक्षा असते. परिणामी दिवाळी संपून ४-५ दिवस होत आले तरी कचऱ्याच्या साम्राज्यामुळे मुंबईतील अनेक मैदाने ओस पडलेली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत अभियाना’द्वारे संपूर्ण देशवासीयांना आपला परिसर स्वच्छ राखण्याची साद घातली असली तरी मैदानांवरील कचरा उचलण्यासाठी अद्याप कुणीही पुढाकार घेतलेला नाही. मुंबई महापालिकेच्या स्वच्छता विभागालाही अद्याप जाग आलेली दिसत नाही.

हल्ली घरासमोर किंवा सोसायटय़ांच्या आवारात फटाके फोडण्यापेक्षा तरुण मुले मैदानांवर फटाके फोडू लागली आहेत. दिवाळीत हजारो रुपयांच्या फटाक्यांचा धुरळा उडवल्यानंतर हा कचरा मैदानांवर तसाच पडून राहतो. घरासमोर फोडलेल्या फटाक्यांचा कचराही याच मैदानांवर आणून टाकला जातो. त्यामुळे या कचऱ्यांच्या साम्राज्यात खेळताना खेळाडूंना काही वेळेला दुखापतींनाही सामोरे जावे लागते. मैदानांवर गेल्या काही दिवसांपासून असलेला हा कचरा उचलणार कोण, असा प्रश्न सतावू लागला आहे.

दिवाळीत फुलबाज्यांच्या तारा मैदानांत टाकून दिलेल्या असतात. तिथे खेळणाऱ्या मुलांना त्या लागून गंभीर जखमा होऊ शकतात. एक जागरूक नागरिक या नात्याने मैदानावरील कचरा साफ करण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. फक्त दिवाळीतच नव्हे, राजकीय पक्षाच्या कार्यक्रमानंतर फटाक्यांची आतषबाजी होते. नेत्यांना प्रसिद्धी मिळते, पण कार्यक्रमानंतर मैदानावर कचरा तसाच पडून राहतो. महापालिकेतील स्वच्छता कर्मचारी आपले काम नित्यनेमाने चोखपणे पार पाडत असले तरी मैदान स्वच्छ करण्याची भावना प्रत्येकाच्या मनात रुजायला हवी. फक्त मैदानावरील अतिक्रमण हटवण्याऐवजी त्याची देखभाल करणे व खेळासाठी उपयुक्त ठरवणे, ही काळाची गरज बनली आहे.
– भास्कर सावंत, मैदान बचाव समितीचे अध्यक्ष.

कोणताही मेळावा किंवा कार्यक्रमानंतर कचरा उचलण्याची संस्कृती आपल्याकडे अजून रुजलेली नाही. फटाके मैदानावर वाजवणे, हे एका दृष्टीने फायद्याचे असले तरी त्यानंतर १५ मिनिटे काढून मैदान स्वच्छ करण्याची तसदी कुणीही घेत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ची हाक दिल्यानंतर लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली असली तरी काही संस्था फक्त फोटो काढण्याच्या उद्देशानेच या अभियानात भाग घेतात. ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनानंतर मुंबई महापालिकेचा स्वच्छता विभाग ज्या प्रकारे काम करतो, तसेच काम त्यांच्याकडून दिवाळीनंतरही अपेक्षित आहे. मुळातच लोकांमध्ये सामाजिक मानसिकता भिनण्याची गरज आहे.
– उदय देशपांडे, श्री समर्थ व्यायाम मंदिराचे कार्यवाह

महापालिकेच्या मोकळ्या मैदानांवर कुणीही येऊन फटाके वाजवतात. या मैदानांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणताही सुरक्षा किंवा स्वच्छता कर्मचारी तैनात नसतो. त्यामुळे दिवाळीनंतर पडणारा कचरा महापालिकेने साफ करायचा की त्या मैदानांवर सराव करणाऱ्यांनी हा प्रश्न नेहमीच सतावतो. अशा वेळेला मैदानावर सराव करणारे खेळाडूच हा कचरा साफ करत असतात. जर मैदानांवर फटाके फोडणाऱ्यांनी आपली जबाबदारी स्वीकारून हा कचरा उचलला तर मुलांना खेळण्यासाठी नीटनेटकी मैदाने उपलब्ध होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानानंतर लोकांमध्ये ही जागरूकता निर्माण झाली, तर या अभियानाचे ते यश म्हणावे लागेल.
– दत्ताराम दुदम, शिवछत्रपती पुरस्कार विजेते मल्लखांब प्रशिक्षक