विजेतेपदासाठी दावेदार असलेल्या महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील खो-खोच्या पुरुष गटात आगेकूच राखली. पुडुचेरी संघाने पुरुष व महिला या दोन्ही गटांत विजय मिळवीत आव्हान राखले. एकतर्फी झालेल्या लढतीत महाराष्ट्राने पश्चिम बंगाल संघावर १७-११ असा एक डाव सहा गुणांनी पराभव केला. महाराष्ट्राकडून अमोल जाधव याने सहा गडी बाद करीत आक्रमणात कौतुकास्पद कामगिरी केली. युवराज जाधव याने २ मिनिटे ४० सेकंद संरक्षण केले तसेच त्याने चार गडी बाद करीत अष्टपैलुत्व सिद्ध केले. बंगालकडून बुबोई याने पाच गडी टिपले तर सुजीत साह याने दोन गडी बाद केले. पुरुष गटांतच पुडुचेरी संघाने छत्तीसगढ संघावर १०-९ असा निसटता विजय मिळविला. महिलांच्या गटात उपान्त्य फेरीत स्थान मिळवताना कर्नाटकवर ९-५ असा एक डाव चार गुणांनी विजय मिळविला. त्या वेळी त्यांच्याकडून श्रुती सकपाळ (३ मिनिटे ४० सेकंद), सारिका काळे (२ मिनिटे ५० सेकंद), शिल्पा जाधव (तीन गडी) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.