सुरुवातीच्या काळात तो रेल्वेमध्ये तिकीट तपासनीस म्हणून तो कार्यरत होता. त्यानंतर आपल्या चाणाक्ष नेतृत्वाच्या जोरावर त्याचे जगभरात नाव झाले. रेल्वेशी संपर्क सुटला. विमान किंवा महागडय़ा गाडय़ांमधून तो सर्रास फिरायला लागला. पण तब्बल १३ वर्षांनी पुन्हा रेल्वेमधून प्रवास करायचा योग आला, तो महेंद्रसिंग धोनीला. विजय हजारे करंडकासाठी तब्बल त्याने झारखंड संघासोबत रांची ते हावडापर्यंतचा रेल्वेप्रवास केला.

खरगपूर येथे २००० साली धोनी तिकीट तपासनीसाचे काम करत होता. त्यानंतर तो भारतीय संघात सामील झाला आणि त्याने रेल्वेची साथ सोडली. २००७ साली त्याने भारताला ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकवून दिला. त्यानंतर एकदिवसीय विश्वचषकही जिंकून दिला. या कालावधीत तो कधीही रेल्वेने फिरला नाही. आता झारखंड संघाचे नेतृत्व करताना मात्र त्याला रेल्वेने प्रवास करावा लागला. झारखंडचे सामने कोलकातामध्ये होणार आहेत आणि कर्णधार या नात्याने त्याने संघाबरोबर प्रवास केला.

‘‘झारखंडच्या संघासाठी खास रेल्वेच्या डब्याचे आरक्षण करण्यात आले नव्हते. त्यामुळे धोनीने संघासोबत अन्य प्रवाशांसह द्वितीय श्रेणीच्या वातानुकूलित रेल्वेच्या डब्यातून प्रवास केला. झारखंडच्या संघाने २३ जणांचे आरक्षण यावेळी केले होते,’’ अशी माहिती पूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी संजॉय घोष यांनी दिली.

धोनीने क्रीया योगा एक्सप्रेसमधून रात्री ९.४० मिनिटांनी रांची येथून प्रवासाला सुरुवात केली. ही रेल्वे खगरपूर मार्गे (जिथे धोनी तिकीट तपासनीस होता) हावडय़ाला सकाळी ६.३० मिनिटांनी पोहोचली.

‘‘धोनी रेल्वेने प्रवास करणार याची आगाऊ माहिती आम्हाला देण्यात आली होती. त्यामुळे आम्ही रांचीपासून हावडय़ापर्यंत खास सुरक्षाव्यवस्था केली होती. रेल्वे ही भारताची जीवनवाहिनी आहे. रेल्वेने प्रवास करत धोनीने आपला मोठेपणा दाखवला आहे,’’ असे घोष यांनी सांगितले.