भारताच्या कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० संघांच्या कर्णधारपदांचा महेंद्रसिंग धोनीने राजीनामा दिला. त्यानंतर काही दिवसांपूर्वी आयपीएलमधील रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाच्या नेतृत्वावरून पायउतार व्हावे लागले. त्यामुळे आता झारखंड संघाचे विजय हजारे करंडक स्पर्धेत नेतृत्व करताना धोनीची कसोटी असेल. शनिवारी झारखंडचा पहिला सामना कर्नाटकविरुद्ध ईडन गार्डन्सवर होणार आहे.

दहा वर्षांपूर्वी धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला होता. या संघातील रॉबिन उथप्पा कर्नाटकच्या संघात असून या दोघांमध्ये सरावापूर्वी चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. या दोघांनी एकमेकांसहित हास्यविनोद केला आणि त्यानंतर आपल्या संघासह सरावासाठी सज्ज झाले.

धोनीच्या नेतृत्वाखालील झारखंडच्या संघात गुणवान युवा खेळाडूंचा भरणा आहे. सौरभ तिवारी, इशांक जग्गी आणि इशान किशन यांनी सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती.

कर्नाटकचे कर्णधार मनीष पांडे असून तो धोनीविरुद्ध खेळण्यासाठी उत्सुक आहे. कर्नाटकच्या संघात उथप्पा आणि स्टुअर्ट बिन्नीसारखे नावाजलेले खेळाडू आहेत. त्याचबरोबर स्थानिक सामन्यांमध्ये सातत्याने नेत्रदीपक कामगिरी करणारा मयांक अगरवालवर साऱ्यांच्या नजरा असतील.