भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने मुंबईतील अंधेरी येथे चार नवीन फ्लॅट्स खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, ३५ वर्षीय धोनी लवकरच आपल्या संपूर्ण कुटुंबियांसह मुंबईत स्थायिक होणार आहे. धोनी अंधेरीतील या सोसायटीत आपल्यासाठी स्वतंत्र जीमची उभारणी करत असल्याचे वृत्त ‘मुंबई मिरर’ने दिले आहे. तर स्थानिक दलाल देखील ग्राहकांना फ्लॅट्स दाखवताना सोसायटीचा उल्लेख ‘धोनीची बिल्डिंग’ असा करत असल्याचीही माहिती ‘मिरर’ने प्रकाशित केली आहे. या सोसायटीच्या जवळच बॉलीवूड सेलिब्रिटी विपूल शहा, चित्रांगधा सेन, प्राची देसाई आणि प्रभू देवा यांचे फ्लॅट्स आहेत.

वाचा: ‘यापुढेही क्रिकेटचा आनंद लुटत राहीन’

वाचा: धोनीची भेट घेण्यासाठी ‘त्या’ चाहत्याने तब्बल १० फुट उंच कुंपण ओलांडले!

गेल्याच आठवड्यात धोनीने भारतीय संघाच्या कर्णधार पदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर मंगळवारी धोनीने इंग्लंडविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात संघाचे अखेरचे नेतृत्त्व केले. येत्या १५ जानेवारी रोजी भारतीय संघाचा इंग्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना पुण्यात खेळविण्यात येणार असून विराट कोहली संघाचे नेतृत्त्व करणार आहे. धोनीचा देखील संघात समावेश आहे. धोनीने इंग्लंडविरुद्ध झालेल्या सराव सामन्यात ४० चेंडूत ६८ धावांची तुफान खेळी साकारली होती. यात चार चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. धोनी, युवराज यांची अर्धशतके आणि रायुडूची शतकी खेळीनंतरही भारतीय संघाचा या सामन्यात तीन विकेट्सने पराभव झाला. धोनी भारतीय संघाचा आजवरचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. धोनीच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने २००७ साली ट्वेन्टी-२० विश्वचषक, २०११ साली एकदिवसीय क्रिकेटचा विश्वचषक आणि २०१३ साली चॅम्पियन्स करंडक अशा आयसीसीच्या महत्त्वाच्या स्पर्धा जिंकल्या.

वाचा: नवीन घराची पाहणी करताना अनुष्का-विराट कॅमेऱ्यात कैद