ज्या बांगलादेशमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला होता, तिथेच धोनीच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया चषकाला गवसणी घातली. याबद्दल विचारले असता धोनी म्हणाला की, ‘‘सर्वाना आपल्या भावना व्यक्त करण्याची मुभा आहे; पण क्रिकेट खेळण्यापेक्षा दूरचित्रवाहिनीवर ते पाहणे कधीही सोपे असते. त्यामुळेच टीका करणे हे ही सर्वात सोपी गोष्ट आहे.’’
याबाबत धोनी पुढे म्हणाला की, ‘‘भारतामध्ये प्रत्येकाला मतप्रदर्शन करण्याचा हक्क आहे आणि क्रिकेटवर मतप्रदर्शन करणे तर अधिकारच आहे. त्यामुळे असे खेळा, तसे खेळा, असे करू नका, तसे करा, असे सल्ले आम्हाला दिले जातात. मुळात समस्या अशी आहे की, क्रिकेट हा दूरचित्रवाणीवर पाहायला फार सोपा वाटतो, पण मैदानात खेळण्यासाठी मात्र तेवढा सोपा नक्कीच नाही.’’
या वेळी खेळाडूंना सल्ला देण्याबरोबरच धोनीने लोकांवर आणि प्रसारमाध्यमांवर गोड बोलून प्रहार केला आहे. ‘‘जर टीका करण्यात आली किंवा डोक्यावर घेण्यात आले तर त्याकडे जास्त लक्ष देऊ नये. खेळाडूने या दोन्हींमधला मार्ग स्वीकारायला हवा. प्रसारमाध्यमेही यामध्ये मोलाची भूमिका बजावताना दिसतात. खेळाडूने काही चांगले केल्यास त्याला फार मोठय़ा उंचीवर नेतात, पण जर त्यांच्याकडून चांगली कामगिरी झाली नाही तर त्याच खेळाडूवर आगपाखड करायलाही ते कमी करत नाहीत. जर एखादा सामना जिंकलो, तर तो तुम्हा जिंकायलाच हवा होतात, अशी प्रतिक्रिया होते; पण जर सामना गमावला तर दाही बाजूंनी टीकास्त्रे सुटतात. त्यामुळे खेळाडूने स्वत:वरच अधिक विश्वास ठेवायला हवा.’’

 

‘धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला यावे’
पीटीआय, नवी दिल्ली
‘‘महेंद्रसिंग धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केल्यास पुढील दोन-तीन वष्रे तो प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर अधिराज्य गाजवू शकतो आणि भारतालाही सर्वाधिक विजय मिळवून देऊ शकतो,’’ असे मत भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले. आशिया चषक स्पध्रेच्या अंतिम सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन धोनीने एकहाती विजय मिळवून दिला.
‘‘धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणे, हे संघाच्या हिताचे आहे. जलदगती आणि फिरकीपटू गोलंदाजांना तो जोमाने सामोरे जाऊ शकतो आणि परिस्थितीनुसार खेळात बदल करण्याचे कौशल्य त्याच्याकडे आहे. २०१५च्या विश्वचषक स्पध्रेपासून मी हेच बोलत आलो आहे. या क्रमांकावर येऊन तो बाद होणारच नाही, असे मी म्हणत नाही, परंतु तो भारताला अधिक विजय मिळवून देऊ शकतो,’’ असे सेहवागने स्पष्ट केले.