आयपीएलमधील नवीन संघ विकत घेण्यासाठी भाराताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी उत्सुक असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात आहे. रांचीतील काही मोठय़ा उद्यागपतींच्या साथीने धोनी आयपीएलमधील संघ घेणार असल्याचे बोलले जात आहे. या शर्यतीमध्ये कोलकाताचे उद्योजक संजीव गोएंका यांचेही नाव पुढे आले आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या सल्ल्यानुसार गोएंका यांनी आयपीएलचा संघ घेण्याची तयारी दाखवली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीच्या अहवालानुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांचे दोन वर्षांसाठी निलंबन केले आहे. त्यांच्या जागी दोन नवीन संघ स्पर्धेत खेळवण्यात येणार असून त्याची घोषणा आठ डिसेंबरला करण्यात येणार आहे.आयपीएलमधील संघ विकत घेण्यास उत्सुक असल्याचे धोनी आणि गोएंका यांनी बीसीसीआयला कळवले आहे. संघ विकत घेण्यासाठी ४० कोटी रुपये ही पायाभूत किंमत ठरवण्यात आली असून हे पैसे भरण्यास त्यांनी तयारी दर्शवली आहे.
कोलकात्यामधील आरपीजी समूहाचे संजीव गोएंका प्रमुख आहे. यापूर्वी गांगुलीच्या सल्ल्यानुसार गोएंका यांनी आयएसएलमधील कोलकता डी अ‍ॅटलेटीको सहमालक पद स्वीकारले आहे.
आयपीएलमधील संघ विकत घेण्यासाठी धोनीला यावेळी बऱ्याच उद्योजकांची साथ असल्याचे म्हटले जात आहे. रांचीतील मित्तल समूह धोनीच्या पाठीशी असल्याचे म्हटले जात आहे. त्याचबरोबर व्हिडीओकॉन आणि जेएसडब्लू स्टील या कंपन्यादेखील संघ विकत घेण्यासाठी धोनीच्या पाठीशी असल्याचे समजते.
‘‘आम्ही जयपूर आणि कोची या दोन्ही संघांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवीन येणारे दोन संघ उर्वरित शहरांचे प्रतिनिधित्व करू शकतात,’’ असे आयपीएल प्रशासकीय समितीमधील एका अधिकाऱ्याने सांगितले.