भारताचा नेमबाज मयराज अहमद खानने जागतिक चषक नेमबाजी स्पर्धेतील स्कीट या प्रकारात रुपेरी कामगिरी केली. ही स्पर्धा रिओ दी जानिरो येथे सुरू आहे.
मयराजने जागतिक चषक स्पर्धेत भारताला स्कीट प्रकारात पहिलेच पदक मिळवून दिले. मयराज व स्वीडनचा माकरेस स्वेनसन यांचे प्रत्येकी १४ गुण झाले. टायब्रेकरमध्ये स्वेनसनने मयराजला पिछाडीवर टाकले व सुवर्णपदक मिळवले. इटलीच्या तामारो कॅसान्ड्रोला कांस्यपदक मिळाले. पात्रता फेरीत मयराजने १२२ गुणांची नोंद केली. त्याने २०१०मध्ये राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत भारताला सांघिक विभागात सुवर्णपदक मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. आतापर्यंत मयराजने २६ वेळा जागतिक चषक स्पर्धेत भाग घेतला असून प्रथमच त्याने अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. त्याने गतवर्षी इटलीत झालेल्या जागतिक शॉटगन अजिंक्यपद स्पर्धेत ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले होते.