श्रीकांतचे आव्हान संपुष्टात

सायना नेहवालच्या अनुपस्थितीत मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत एकमेव प्रतिनिधी असलेल्या पी. व्ही. सिंधूने अंतिम फेरीत धडक मारत आपले कर्तृत्व सिद्ध केले. अन्य लढतीत किदम्बी श्रीकांतला उपांत्य फेरीच्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले.

उपांत्य फेरीच्या अटीतटीच्या लढतीत सिंधूने अव्वल मानांकित जि ह्य़ुआन स्युंगवर २१-१९, १२-२१, २१-१० असा विजय मिळवला. एक तासापेक्षा अधिक वेळ चाललेल्या लढतीत बाजी मारत सिंधूने कारकीर्दीतील पाचव्या ग्रां.प्रि. जेतेपदाकडे वाटचाल केली. २०१३ मध्ये सिंधूने याच स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. याव्यतिरिक्त मकाऊ स्पर्धेत सिंधूने जेतेपदांची हॅट्ट्रिकची किमया केली होती.

ह्य़ुआनविरुद्धच्या लढतीत सिंधूची कामगिरी २-२ अशी होती. पहिल्या गेममध्ये ११-११ अशी बरोबरी होती. यानंतर सलग सात गुणांची कमाई करीत सिंधूने महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. या आघाडीच्या बळावरच तिने पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सिंधूला तोच फॉर्म कायम राखता आला नाही. ह्य़ुआनने ११-१० अशी निसटती आघाडी घेतली. यानंतर सिंधूच्या खेळातली एकाग्रता हरवली. ह्य़ुआनने सलग सात गुण पटकावत गेम नावावर केला.

तिसऱ्या आणि अंतिम गेममध्ये सिंधूने ३-० अशी आघाडी घेतली. यानंतर पहिल्या गेमप्रमाणे सात गुण मिळवत सिंधूने वर्चस्व गाजवले. ही आघाडी सातत्याने वाढवत सिंधूने तिसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला. स्मॅशेस, ड्रॉप, क्रॉसकोर्ट अशा भात्यातील फटक्यांचा प्रभावीपणे उपयोग करीत सिंधूने सरशी साधली.

पुरुष गटात मलेशियाच्या इस्कंदर झुल्करनैन झैनुद्दीनने किदम्बी श्रीकांतवर २७-२५, २१-१९ अशी मात केली. चुरशीच्या पहिल्या गेममध्ये एकेका गुणासाठी मुकाबला रंगला. जागतिक क्रमवारीत अव्वल दहामध्ये असणाऱ्या श्रीकांतने तडाखेबंद खेळ करीत वर्चस्व राखले. मात्र मोक्याच्या क्षणी झैनुद्दीनने आपला खेळ उंचावत गेम नावावर केला. पहिल्या गेममध्ये जबरदस्त ऊर्जा खर्च झालेल्या श्रीकांतला दुसऱ्या गेममध्ये लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही आणि त्याने सामना गमावला.