माजी जागतिक विजेता मानवजितसिंग याने जागतिक चषक नेमबाजी स्पर्धेतील ट्रॅप प्रकारात कांस्यपदक जिंकले, मात्र ऑलिम्पिकची पात्रता पूर्ण करण्यात तो अपयशी ठरला. मेक्सिकोमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत इटलीच्या मॅसिमो फॅब्रिझी याने सोनेरी कामगिरी केली तर ऑस्ट्रेलियाच्या मायकेल डायमंडने रौप्यपदक पटकाविले. कांस्यपदकासाठी झालेल्या लढतीत मानवजितने पोर्तुगालच्या जाओ अ‍ॅझेव्हेदो याच्यावर मात केली. पहिल्या बारा संधींमध्ये दोघांचे समान गुण झाल्यानंतर टायब्रेक नेम घेण्यात आला. त्यामध्ये मानवजितची सरशी झाली. भारताच्या पृथ्वीराज तोंडाईमन व झोरावरसिंग संधू यांना अनुक्रमे २४ वे व ४९ वे स्थान मिळाले. पात्रता स्पर्धेतील पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये भारताच्या तीनही खेळाडूंचे प्रत्येकी ४९ गुण झाले होते. नंतरच्या तीन फेऱ्यांमध्ये मानवजितने चांगली कामगिरी करीत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. त्याने १२३ गुण नोंदविले. डायमंड याने १२४ गुण नोंदविले होते. पृथ्वीराज याने १२० गुण मिळविले तर संधू याने ११७ गुणांची कमाई केली. पात्रता फेरीत त्यांना अनुक्रमे १५ वे व १८ वे स्थान मिळाले.