सातत्याने अपयशी  ठरलेल्या वेन रुनीला संघाबाहेर बसवण्याचा मँचेस्टर युनायटेडचे प्रशिक्षक जोस मॉरिन्हो यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाचे फलित झाले. शनिवारी ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पध्रेच्या सामन्यात युनायटेडने संपूर्ण ताकदीने खेळ करताना गतविजेत्या लिस्टर सिटीला ४-१ असे पराभूत केले.

झालटन इब्राहिमोव्हिक या एकाच आक्रमणपटूसह पाच मध्यरक्षक आणि चार बचावपटूंच्या रणनीतीने मैदानात उतरलेल्या युनायटेडने पहिल्या सत्रातच सामना खिशात घातला. ख्रिस स्मॉलिंग, जुआन माटा, मार्कस रॅशफोर्ड व पॉल पोग्बा यांनी मिळालेल्या संधीचे सोनं करताना युनायटेडला पहिल्या सत्रात ४-० अशी निर्विवाद आघाडी मिळवून दिली. युनायटेडच्या बचावफळीने लिस्टरचे आक्रमण रोखण्याची भूमिकाही चोख वटवल्याने मॉरिन्हो यांच्या चेहऱ्यावर तेज दिसत होते.  सामन्याच्या २२व्या मिनिटाला स्मॉलिंगने डॅलेय ब्लाईंडच्या पासवर अप्रतिम हेडरद्वारे गोल करत युनायटेडला १-० अशी आघाडी मिळवून दिले. मध्यरक्षकांनीही आपली जबाबदारी अचूक पार पाडताना युनायटेडच्या आघाडीत भर घातली. ३७व्या मिनिटाला जेसे लिंगार्डच्या पासवर माटाने शिताफीने गोल केला आणि युनायटेडला २-० असे आघाडीवर नेले. त्यानंतर पहिल्या सत्राच्या अखेरच्या पाच मिनिटांत रॅशफोर्ड (४०) आणि पोग्बा (४२) यांनी गोल करत युनायटेडची आघाडी ४-० अशी मजबूत केली. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला मॉरिन्हो रुनीला बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरवतील अशी अपेक्षा होती. मात्र रुनीला ८३ मिनिटे मैदानाबाहेरच बसावे लागले. मध्यंतरानंतर लिस्टरने आक्रमक पवित्रा अवलंबवला. ५९व्या मिनिटाला डेमाराई ग्रे याने बॉक्सच्या बाहेरून अप्रतिम गोल करत लिस्टरचे खाते उघडले.   त्यांना या एकमेव गोलवर समाधान मानावे लागले.