गोल अडवण्याच्या नादात गोलरक्षक डेव्हिड डी गिएच्या हातून गोलजाळीत चेंडू गेल्याने मॅन्चेस्टर युनायटेडला धक्कादायक पराभव पत्करावा लागला. डेव्हिडच्या स्वयंगोलमुळे स्पध्रेतून बाद होण्याच्या मार्गावर असलेल्या सदरलँडला २-१ अशा विजयासह दिलासा मिळाला. मात्र, अव्वल चारमध्ये स्थान पटकावण्यासाठी आतूर असलेल्या युनायटेडला प्रतीक्षा पाहावी लागणार आहे.

सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला वाहबी खाज्रीच्या गोलने सदरलँडने १-० अशी आघाडी घेत युनायटेडला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु ३९व्या मिनिटाला अँथोनी मार्शलच्या गोलने युनायटेडला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. सामना १-१ अशा बरोबरीतच सुटेल असे वाटत असताना सदरलँडने आक्रमण केले.

८२व्या मिनिटाला सदरलँडच्या आक्रमणपटूने हेडरद्वारे गोल करण्याचा प्रयत्न केला. डेव्हिडने तो गोल अडवला, परंतु चेंडूवर ताबा मिळवण्यात तो अपयशी ठरला आणि चेंडू गोलजाळीत गेला. या स्वंयगोलने सदरलँडला २-१ असा विजय मिळवून दिला.