मँचेस्टर युनायटेड अव्वल स्थानावर * सदरलँड क्लबवर ३-०ने विजय
इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये (ईपीएल) ११ सामन्यांमधील गोल ‘दुष्काळ’ मँचेस्टर युनायटेडच्या वेन रुनीने अखेरीस संपवला. ओल्ड ट्रॅफर्डवरील सदरलँडविरुद्धच्या लढतीत रुनीने गोलची नोंद केली. रुनीसह मेम्फीस डिपेय आणि जुआन मार्टा यांनी प्रत्येकी एक गोल करून युनायटेडला ३-० असा दणदणीत विजय मिळवून दिला.
या विजयामुळे आणि त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी मँचेस्टर सिटीच्या पराभवामुळे युनायटेडला ईपीएल गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेणे सहज शक्य झाले. सिटीला टोटेन्हॅम हॉटस्पूरकडून १-४ असा पराभव पत्करावा लागला. युनायटेडच्या खात्यात १६ गुण जमा असून सिटी १५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे.
पहिल्या सत्रात दोन्ही संघाच्या आक्रमक खेळाने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली. पहिल्या सत्रातील अतिरिक्त वेळेत मेम्फीस डिपेय याने जुआन मार्टाच्या पासवर गोल करून युनायटेडला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच मिनिटात रुनीने गोल करून आघाडीत २-० अशी भर टाकली. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या युनायटेडच्या या लढतीत रुनीवर सर्वाच्या नजरा खिळल्या होत्या.
जवळपास १००० मिनिटे गोल करण्यात अपयशी ठरलेल्या रुनीला टीकाकारांना उत्तर देण्यासाठी गोल करणे आवश्यक होते. त्याने त्या दिशेने बहारदार खेळ केला आणि ४६व्या मिनिटाला त्याला गोल करण्यात यश आले. अँथोनी मार्शल याच्या पासवर रुनीने हा गोल केला. ९०व्या मिनिटाला मार्टाने त्यात भर टाकली आणि युनायटेडचा ३-० असा विजय पक्का केला.