युनायटेडसमोर गतविजेत्या लिस्टर सिटीचे आव्हान

नाव मोठे आणि दर्शन छोटे.. अशी अवस्था सध्या इंग्लंड आणि मँचेस्टर युनायटेडचा दिग्गज खेळाडू व कर्णधार वेन रुनी याची झाली आहे. लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात सातत्याने येत असलेल्या अपयशानंतरही रुनीला युनायटेड क्लबकडून खेळण्याची संधी मिळत आहे. शनिवारी इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पध्रेत युनायटेडसमोर गतविजेत्या लिस्टर सिटीचे आव्हान असून या लढतीत रुनीला खेळवायचे की नाही, यावरून प्रशिक्षक जोस मॉरिन्हो यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

गुरुवारी नॉर्दम्प्टन क्लबविरुद्ध मॉरिन्हो यांनी युनायटेडच्या अव्वल खेळाडूंना विश्रांती दिली होती. मात्र, रुनीला संपूर्ण ९० मिनिटे खेळविण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ही लढत युनायटेडने ३-१ अशी जिंकली, परंतु रुनीला गोल करण्यात अपयश आले. रुनीने गोल करावे, अशी इच्छा मॉरिन्हो यांनी व्यक्त केली होती. मागील हंगामात सेंट्रल मध्यरक्षक म्हणून खेळणाऱ्या रुनीला यंदा मॉरिन्होने त्याच्या आवडत्या स्थानी खेळवले. तरीही रुनीला अपेक्षेइतके यश आले नाही. त्याच्या जागी पॉल पोग्बा आणि झाल्टन इब्राहिमोव्हिक यांना खेळवल्यास क्लबच्या फायद्याचे ठरेल, असे फुटबॉलतज्ज्ञ सांगत आहेत; पण लिस्टर सिटीविरुद्ध मॉरिन्हो रुनीला आक्रमकपटूच्या फळीत खेळवण्याची शक्यता आहे.

रुनीला दहाव्या स्थानी कायम ठेवण्याचा पहिला पर्याय मॉरिन्होसमोर आहे. या लढतीत रुनीने गोल केल्यास युनायटेडकडून सर्वाधिक २४९ गोल करणाऱ्या बॉबी चार्लटन यांचा विक्रम तो मोडू शकतो. त्याला इब्राहिमोव्हिकसोबत ताळमेळ जुळवून घेण्याची संधी द्यायला हवी. मध्यरक्षक म्हणून पोग्बाला अजूनही साजेसा खेळ करता आलेला नाही. नॉर्दम्प्टनविरुद्धच्या विजयाने युनायटेड पुन्हा विजयपथावर परतला आहे. त्यामुळे त्यांचे मनोबल चांगलेच उंचावले आहे. लिस्टरविरुद्ध घरच्या मैदानावर आत्तापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यांत (५ विजय, २ अनिर्णीत) युनायटेड अपराजित राहिला आहे.