आर्सेनलवर निर्णायक विजय; मार्कस रॅशफोर्डचे दोन गोल
इंग्लिश प्रीमिअर लीग (ईपीएल) फुटबॉल स्पध्रेच्या अव्वल चार संघांमध्ये स्थान निश्चित करून जेतेपदाच्या शर्यतीत राहण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या मँचेस्टर युनायटेडने रविवारी सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या आर्सेनलला ३-२ असे नमवले आणि सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. १८ वर्षीय मार्कस रॅशफोर्डने दोन गोल करून विजयात सिंहाचा वाटा उचलला, तर अँडर हेरेराने एक गोल करून त्याला चांगली साथ दिली. या निकालानंतरही युनायटेड ४४ गुणांसह पाचव्या, तर आर्सेनल ५१ गुणांसह तिसऱ्या स्थानावर कायम आहे. सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव असल्यामुळे टीकेचे धनी बनलेले युनायटेडचे प्रशिक्षक लुईस व्ॉन गाल यांच्यासाठी हा विजय दिलासादायक आहे.
रॅशफोर्डने २९व्या मिनिटाला युनायटेडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. अवघ्या तीन मिनिटांतच रॅशफोर्डने ही आघाडी दुप्पट करून युनायटेडला सामन्यावर पकड मिळवून दिली. मात्र, ४०व्या मिनिटाला आर्सेनलच्या डॅनी वेलबेकने गोल करून मध्यंतरापर्यंत सामना २-१ असा आणला. दुसऱ्या सत्रात युनायटेडचे वर्चस्व जाणवत होते. ६५व्या मिनिटाला अँडर हेरेराने गोल करून युनायटेडची आघाडी ३-१ अशी वाढवली. मात्र, चार मिनिटांत आर्सेनलकडून त्याला प्रत्युत्तर मिळाले. त्यांचा अव्वल खेळाडू मेसूट ओझीलने क्लबसाठी दुसरा गोल केला. मात्र, त्याचा हा प्रयत्न आर्सेनलचा पराभव टाळू शकला नाही. युनायटेडने ३-२ असा विजय निश्चित करून सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.