राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकप्राप्त मनदीप जांग्राने बँकॉक, थायलंड येथे सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली.
वेल्टरवेट ६९ किलो वजनी गटातून खेळणाऱ्या मनदीपने व्हिएतनामच्या व्हिएन गॉक ह्य़ुन्हचा ३-० असा धुव्वा उडवला. मनदीपने दिलेल्या जोरदार ठोशामुळे ह्य़ुन्हच्या डाव्या डोळ्याच्या खाली जखम झाली. या जखमेचे स्वरूप गंभीर असल्यामुळे मनदीपला विजयी घोषित करण्यात आले. पुढच्या फेरीत त्याची लढत जपानच्या सायुहिरो सुझुकीशी होणार आहे.
९१ किलो वजनी गटातून खेळणाऱ्या मनप्रीत सिंगचा मुकाबला श्रीलंकेच्या न्यूवान सुगीवा संपतशी होणार आहे. ही लढत जिंकल्यास उपांत्यपूर्व फेरीत त्याच्यासमोर उझबेकिस्तानच्या रुस्तुम तुलागनोव्हचे आव्हान असणार आहे.
९१ किलोपेक्षा अधिक वजनी गटात सतीश कुमार आणि कोरियाच्या ह्य़ोक री जिन आमनेसामने असणार आहेत. मनीष कौशिक ६० किलो वजनी गटात चीनच्या चिन लाँग यांच्यात सामना होणार आहे.