दिल्लीकर मंडळींचा एक ठोस स्वभाव असतो. मात्र  मनिका त्याला अपवाद आहे. जुगाडापेक्षा मेहनत करून जिंकण्यावर तिचा भर असतो. 

दिल्लीकर मंडळींचा एक ठोस स्वभाव असतो. आत्मविश्वास त्यांच्या धमन्यांतच असतो. आक्रमकपणे व्यक्त व्हायला त्यांना मनापासून आवडतं. काही आगळीक घडली तरी त्यांना चिंता नसते. कारण ‘जुगाड’  हा त्यांचा परवलीचा शब्द असतो. जे जे अत्याधुनिक ते अंगीकारून मिरवण्याकडे त्यांचा कल असतो. रिओ ऑलिम्पिकसाठी निवड झालेली २१ वर्षीय दिल्लीकर टेबल टेनिसपटू मनिका बात्रा वर उल्लेखलेल्या विशेषणांना अपवाद आहे. सहा फूट उंच मनिका अगदी हळू आवाजात बोलते. बोलण्याऐवजी ती कोर्टवर आक्रमक असते. निसर्गाने दिलेली उंची आणि सुस्वरुपामुळे मनिकाला अनेकदा मॉडेलिंगसाठी प्रस्ताव येतात. पण ती नम्रपणे नाही म्हणते. जुगाड करून गोष्टी मिळवण्यापेक्षा अथक मेहनत करून जिंकण्यावर तिचा भर असतो. अपवादाने नियम सिद्ध होतो म्हणतात. कदाचित म्हणून दिल्लीच्या मनिकाने भौगोलिक आणि सामाजिक गुणवैैशिष्टय़े न बाळगता टेबल टेनिस विश्वात अल्पावधीतच स्वत:च्या नावाची छाप उमटवली आहे.

मनिकाच्या घरात, नात्यात कोणीही खेळांमध्ये नाही. मनिकाची मोठी बहीण आंचल दिल्लीतल्या हंसराज मोडल शाळेत टेबल टेनिस खेळायची. दोघींमध्ये अंतर तीन वर्षांचं. मोठय़ा बहिणीचा खेळ पाहताना मनिकाला दोन रॅकेट्स आणि इटुकल्या चेंडूच्या खेळाची गोडी कधी लागली कळलीच नाही. नवव्या वर्षीच मनिकाने दिल्लीतल्या बहुतांशी स्पर्धाच्या जेतेपदावर नाव कोरले. संदीप गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली मनिकाने गांभीर्याने खेळायला सुरुवात केली. रिओ ऑलिम्पिकसाठी मनिकाचा जोरदार सराव संदीप यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ‘संदीप सरांची माझ्या वाटचालीत निर्णायक भूमिका आहे. त्यांच्याकडून टेबल टेनिसची धुळाक्षरे गिरवली.जिंकण्याइतकेच शंभर टक्के प्रदर्शन देणे महत्त्वाचे आहे याची जाणीव त्यांनी करून दिली’, असे मनिका सांगते. उंचीची मिळालेली देणगी, दडपणाच्या क्षणातही शांत राहण्याची वृत्ती, आक्रमक आणि वेगवान खेळ, स्वत:च्या आणि प्रतिस्पध्र्याच्या खेळाचा चोख अभ्यास यांच्या बळावर मनिकाने कनिष्ठ गटातून खेळत असतानाच भारताच्या वरिष्ठ राष्ट्रीय संघात स्थान पटकावले.

मनिकाचे बाबा आजारपणामुळे घरीच असतात. त्यांच्या बाहेर जाण्यावर खूप मर्यादा आहेत. यामुळे आईच घराचा गाडा हाकते. मुलींसाठी आधारवड, घर चालवणे, नवऱ्याची काळजी घेणे अशा तिहेरी जबाबदाऱ्या मनिकाची आई सुशमा यांच्यावर आहेत. आईचा भक्कम पाठिंबा माझ्यासाठी मोलाचा आहे असे मोनिका आवर्जून सांगते. जिंकल्यावर सगळेच सोबत असतात. परंतु दुखापत झाल्यानंतर, पराभूत झाल्यावर आई नेहमीच पाठिंबा देते. मला कधीही नाऊमेद होऊ देत नाही असे मोनिका सांगते.

शाळेनंतर येणारे महाविद्यालयीन जीवन प्रत्येकाला हवेहवेसे असते. मित्रपरिवार, धमालमस्ती अशा वातावरणात रमण्याची प्रत्येकाला हौस असते. मनिकाने जिझस अँड मेरी महाविद्यालयात प्रवेशही घेतला. मात्र स्पर्धा, सरावशिबीरे, प्रवास यामुळे पुरेसा वेळ देत नसल्याने तिने महाविद्यालयाला रामराम ठोकला. चार वर्षांपूर्वी मनिकाला स्वीडनच्या पीटर कार्लसन अकादमीत सरावासाठी शिष्यवृत्ती मिळाली होती. पीटर कार्लसन म्हणजे महान टेबल टेनिसपटू. त्यांनी स्थापन केलेल्या अकादमीत प्रवेश करण्यासाठी जगभरातले टेबलटेनिसपटू उत्सुक असतात. पण दूरवर स्वीडनमध्ये सोळावर्षीय मुलीला एकटं ठेवण्यासाठी तिच्या आईने नकार दिला. ही संधी हुकल्यानंतरही मनिकाने टेबल टेनिसचा ध्यास सोडला नाही. माजी खेळाडू आणि राष्ट्रीय प्रशिक्षक कमलेश मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली मनिकाने दमदार भरारी घेतली.

२०१४ मध्ये ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत मनिकाने पदक पटकावले. मात्र स्पर्धेदरम्यान शारीरिकदृष्टय़ा आपल्याला आणखी कणखर व्हायला हवे याची जाणीव मनिकाला झाली. त्यानुसार मायदेशी परतल्यानंतर मनिकाने तंदुरुस्त होण्यासाठी कार्डिओव्हॅसक्युलर आणि वेटट्रेनिंगवर भर द्यायला सुरुवात केली. उंची खूप असल्याने पाठीची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच हा खटाटोप असे मनिका स्पष्ट करते.

भारताचे टेबल टेनिसपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करत आहेत. परंतु प्रसारमाध्यमे जेमतेम दखल घेतात. त्यांचे प्राधान्य क्रिकेटलाच असते. लोकांना खेळाडूंबद्दल माहिती मिळाली तरच खेळाचा प्रसार होईल असे मनिका सांगते. अन्य खेळांप्रमाणे टेबल टेनिसमध्ये फ्रँचाईज आधारित लीग स्पर्धा सुरू झाल्यास टेबल टेनिसपटूंना उपयुक्त ठरेल असेही ती सांगते.

२०११ मध्ये मनिकाने चिली येथे झालेल्या स्पर्धेत २१ वर्षांखालील गटात रौप्यपदकाची कमाई केली होती. गेल्यावर्षी सुरत येथे झालेल्या राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत तीन पदकांवर कब्जा केला. यंदा यंदा शिलाँग येथे झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत मनिकाने तीन सुवर्णपदकांवर कब्जा केला. ‘शिलाँगमध्ये वातावरण अतिशय थंड होते. सामन्यांच्या वेळी हिटरची व्यवस्था असेल असे वाटले होते. परंतु हिटरची व्यवस्था झाली नाही. थंड वातावरणातच खेळले आणि जिंकले. प्रतिकूल परिस्थितीतही डोके शांत ठेऊन कसे खेळायचे याचा धडा मिळाला’, असे मनिका सांगते. एप्रिल महिन्यात हाँगकाँग येथे झालेल्या आशियाई पात्रता स्पर्धेत के. शामिनी, मौमा दास आणि पूजा सहस्रबुद्धे अशा अनुभवी खेळाडूंना नमवण्याची किमया साधत मनिकाने रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला.  टेबल टेनिस क्षेत्रात पदकांवर भारताची मक्तेदारी नाही. मात्र पहिल्यावहिल्या ऑलिम्पिकवारीत सर्वाना चकित करण्याची संधी मनिकाकडे आहे.

पराग फाटक
parag.phatak@expressindia.com