मनीष पांडेचे शैलीदार शतक; शिखर, अक्षर यांची अर्धशतके

मनीष पांडे याचे शैलीदार शतक तर अक्षर पटेल याची अष्टपैलू कामगिरी यामुळेच भारत ‘ब’ संघास देवधर करंडक क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या सामन्यात तामिळनाडूवर ३२ धावांनी विजय मिळविता आला. तामिळनाडूचा सलामीवीर कौशिक गांधी याने केलेली शतकी खेळी त्यांच्यासाठी अपुरी पडली.

आगामी चॅम्पियन्स चषक स्पर्धेसाठी भारताचा वरिष्ठ संघ निवडण्याकरिता ही स्पर्धा महत्त्वपूर्ण मानली जात आहे. भारत ‘ब’ संघाने रणजी विजेत्या तामिळनाडूविरुद्ध खेळताना ५० षटकांत ८ बाद ३१६ धावा केल्या. त्यामध्ये पांडे याच्या शानदार शतकाचा तसेच त्याने केलेल्या दोन महत्त्वपूर्ण भागीदारींचा मोठा वाटा होता. त्याने शिखर धवन याच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची भर घातली. धवन याने सहा चौकार व दोन षटकारांसह ५० धावा केल्या. पांडे याने १०४ धावा करताना पाच चौकार व चार षटकार अशी फटकेबाजी केली. त्याला अक्षर पटेल याची चांगली साथ लाभली. या जोडीने पाचव्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. पटेल याने एक चौकार व चार षटकार अशी टोलेबाजी करीत ५१ धावा टोलविल्या. शेवटच्या फळीत गुरकिरतसिंग (२५) व अक्षय कर्णेवार (नाबाद २८) यांनीही चमक दाखविली.

तामिळनाडूचा सलामीवीर गांधी याने नारायण जगदीशन याच्या साथीत दुसऱ्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली. गांधी याने नऊ चौकारांसह १२४ धावा केल्या. जगदीशन याने पाच चौकार व तीन षटकारांसह ६४ धावा केल्या. ही जोडी खेळत असताना तामिळनाडूला विजयाच्या आशा होत्या मात्र त्यांच्यानंतर दिनेश कार्तिक (२८) व विजय शंकर (२७) यांचा अपवाद वगळता तामिळनाडूच्या अन्य फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळेच त्यांचा डाव २८४ धावांमध्ये आटोपला.

 संक्षिप्त धावफलक

भारत ‘ब’ संघ-५० षटकांत ८ बाद ३१६ (शिखर धवन ५०, मनीष पांडे १०४, अक्षर पटेल ५१, गुरकिरतसिंग २५, अक्षय कर्णेवार नाबाद २८, रवी साईकिशोर ४/६०) वि.वि. तामिळनाडू ४८.४ षटकांत सर्वबाद २८४ (कौशिक गांधी १२४, नारायण जगदीशन ६४, दिनेश कार्तिक २८, विजय शंकर २७, धवल कुलकर्णी ३/४५, अक्षर पटेल ३/५३, कुलवंत खेजरेरोलिया २/६२, सी.व्ही.मिलिंद २/४२)

डी’कॉकच्या खेळीने आफ्रिकेचे त्रिशतक

हॅमिल्टन : क्विंटन डी’कॉकच्या दमदार ९० धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ३१४ धावांपर्यंत मजल मारता आली. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद ६७ अशी मजल मारली आहे.

शनिवारच्या ४ बाद १२३ या धावसंख्येवरून पुढे खेळताना आफ्रिकेला ठरावीक फरकाने धक्के बसत गेले. पण डी’कॉकने एका बाजूने खेळपट्टीवर पाय रोवून आफ्रिकेला सन्मानजनक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. डी’कॉकने ११ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ९० धावा केल्या, त्याचे शतक दहा धावांनी हुकले. कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिस (५३) आणि कागिसो रबाडा (३४) यांनी डी’कॉकला चांगली साथ दिली.

आफ्रिकेच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी सावधपणे दिवस खेळून काढण्याची जबाबदारी चोख बजावली. टॉम लॅथम (खेळत आहे ४२) आणि जीत रावल (खेळत आहे २५) यांनी कोणतीही जोखीम न उचलता संघाला ६७ धावांची सलामी दिली.