आयपीएलचा लिलाव चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी सर्व खेळाडूंना सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० लीगचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे आणि आयपीएल प्रवेशासाठी समयसूचकता मनोज तिवारीने दाखवली आहे. गुरुवारी झालेल्या सामन्यात उत्तर विभागाविरुद्ध नाबाद ७५ धावांची धडाकेबाज खेळी साकारत मनोजने आयपीएलसाठी आपली दावेदारी सिद्ध केली आहे.

‘‘गेल्या वर्षी दुखापतीमुळे मला आयपीएल खेळता आले नव्हते. त्यामुळे घरी बसून आयपीएल बघताना एक खेळाडू म्हणून मला त्रास झाला. दुखापतीशी माझे ऋणानुबंधाचे नाते आहे; पण दुखापतीमुळे मला कोणताही संघ आपल्या ताफ्यात दाखल करण्याचा विचार करत नव्हता. पण आता ही खेळी योग्य वेळेवर आली असे आपण म्हणू शकतो, कारण आयपीएलमधील संघाच्या काही व्यक्तींनी माझी ही खेळी पाहिली असेल आणि या योग्य वेळी साकारलेल्या खेळीचा मला नक्कीच फायदा होईल,’’ असे मनोजने सांगितले.

आतापर्यंत मनोज आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स या दोन संघांमधून खेळला आहे. गेल्या वर्षी दुखापतीमुळे त्याला कोणत्याही फँ्रचायझीने संघात दाखल करण्याची जोखीम घेतली नव्हती; पण या वेळी लिलावाच्या यादीत त्याचे नाव असून ५० लाख रुपये ही त्याची मूळ किंमत ठेवण्यात आली आहे.

आपल्यावर अन्याय झाल्याचे मत मनोजने बऱ्याच वेळा खासगीत व्यक्त केले आहे. भारतीय संघ असो किंवा आयपीएल, मनोजला कोणत्याही संघात जास्त काळ खेळता आलेले नाही. याबद्दल तो म्हणाला की, ‘‘माझ्यापेक्षा कमी अनुभव असलेले खेळाडूही खेळताना दिसत आहेत; पण त्यासाठी मी काहीही करू शकत नाही. प्रत्येक संघाने त्यांचा निर्णय घ्यायचा असतो. त्यांचा ज्या खेळाडूंवर विश्वास आहे ते त्यांना संघात स्थान देतात; पण संधी मिळाली तर नक्कीच मी त्यांच्या विश्वासाला पात्र ठरेन. एखाददुसऱ्या खेळीवरून एखाद्या खेळाडूविषयी मत बनवायचे नसते, असे मला वाटते. खेळाडूला वेळ द्यायला हवा, त्याचबरोबर त्याच्यातील कलागुणांना कसा वाव देता येईल, हे पाहायला हवे. माझ्या हातामध्ये मेहनत करणे आहे, ती मी नक्कीच करत राहीन.’’

बायकोला क्रिकेट समजत नव्हतं तोपर्यंत ठीक होतं

आता बायकोलाही क्रिकेट समजायला लागलं आहे आणि त्यामुळेच माझ्यावर दडपण येत आहे. आज सकाळी तिने सांगितलं की, आज तुझ्याकडून चांगल्या धावा झाल्या नाहीत तर लीगमधील अखेरचा सामना मी बघणार नाही. त्यामुळे जोपर्यंत बायकोला क्रिकेट समजत नव्हतं तोपर्यंत ठीक होतं, पण आता तिला समजायला लागल्यावर ती माझ्यावर दडपण आणत असते, असे मनोज सांगत होता.

 

उत्तर विभागावर आठ विकेट्स राखून मात; मनोज तिवारी आणि विराट सिंग यांचा झंझावात

मुंबई : बलाढय़ समजल्या जाणाऱ्या उत्तर विभागावर आठ विकेट्स राखून सहज मात करत पूर्व विभागाने सय्यद मुश्ताक अली आंतरविभागीय ट्वेन्टी-२० लीगच्या जेतेपदासाठी दावेदारी केली आहे. प्रथम फलंदाजी करताना उत्तर विभागाला प्रग्यान ओझाने तीन बळी मिळवत धक्के दिले आणि त्यांना १५९ धावांवर रोखले. विराट सिंग आणि कर्णधार मनोज तिवारी यांच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर पूर्व विभागाने सहजपणे उत्तर विभागावर मात केली.

डगमगत्या उत्तर विभागाला सावरण्याची भूमिका पुन्हा एकदा युवराज सिंगने बजावली. उत्तर विभागाचे पहिले तिन्ही फलंदाज प्रत्येकी २० धावा करत बाद झाले. उत्तर विभागाचा डाव अडचणीत सापडला होता, पण युवराजने २४ चेंडूंत ४ षटकारांच्या जोरावर ३८ धावांची खेळी साकारत संघाला शतकाची वेस ओलांडून दिली. त्यानंतर प्रदीप सांगवान (२१) आणि मनन शर्मा (१८) यांनी जलदगतीने धावा करत संघाला दीडशे धावांचा पल्ला गाठून दिला. या सामन्यात पूर्व विभागाचा डावखुरा फिरकीपटू प्रग्यान ओझाने तीन बळी मिळवत उत्तर विभागाचे कंबरडे मोडले.

या आव्हानाचा पाठलाग करताना पूर्व विभागाची सुरुवात चांगली झाली नसली तरी विराट सिंग आणि कर्णधार मनोज तिवारी यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १४९ धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पहिलाच सामना खेळणाऱ्या विराटने सुरुवातीपासूनच उत्तर विभागाच्या गोलंदाजांवर हल्ला करायला सुरुवात केली. मनोजने स्थिरस्थावर झाल्यावर आपल्या पोतडीतील फटके काढत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

मनोजने ४३ चेंडूंत प्रत्येकी पाच चौकार आणि षटकारांच्या जोरावर नाबाद ७५ धावांची खेळी साकारली. या खेळीसह त्याने ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील आपल्या सर्वोत्तम खेळीशी बरोबरी केली. विराटने धडाकेबाज फलंदाजी करत ४८ चेंडूंत ९ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद ७४ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

उत्तर विभाग : २० षटकांत ९ बाद १५९ (युवराज सिंग ३८; प्रग्यान ओझा ३/३३). पराभूत वि. पूर्व विभाग : १६.३ षटकांत २ बाद १६२ (विराट सिंग नाबाद ७४, मनोज तिवारी नाबाद ७५; प्रदीप सांगवान १/२६).