दुखापतीमुळे पी. आर. श्रीजेशची माघार; जागतिक हॉकी लीग स्पध्रेसाठी संघ जाहीर

भारताचा कर्णधार आणि अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने गुडघ्याच्या दुखापतीमुळे माघार घेतल्याने आगामी हॉकी मालिकांसाठी भारतीय पुरुष हॉकी संघाचे नेतृत्व मनप्रीत सिंगकडे सोपवण्यात आले आहे. जर्मनी येथे होणाऱ्या निमंत्रित हॉकी स्पध्रेत आणि इंग्लंड येथे होणाऱ्या जागतिक लीग उपांत्य स्पध्रेत मनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळणार आहे.

जर्मनी येथे तीन देशांची मालिका १ जूनपासून सुरू होणार असून त्यानंतर १५ जूनपासून हॉकी लीग उपांत्य स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या दोन्ही स्पर्धाकरिता १८ सदस्यीय संघ गुरुवारी जाहीर करण्यात आला. जर्मनीत होणाऱ्या मालिकेत भारतासह यजमान जर्मनी आणि बेल्जियम यांचा समावेश आहे. जागतिक लीग स्पध्रेत भारताला ‘ब’ गटात स्थान देण्यात आले असून त्यात कॅनडा, नेदरलँड्स, पाकिस्तान आणि स्कॉटलंड यांचाही समावेश आहे.

श्रीजेशच्या अनुपस्थितीत गोलरक्षकाची जबाबदारी आकाश चिकटे व विकास दहिया यांच्या खांद्यावर असणार आहे. नुकत्याच झालेल्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पध्रेत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या साखळी सामन्यात श्रीजेशला दुखापत झाली होती. मध्यरक्षक एस. के. उथप्पा, सतबीर सिंग आणि आघाडीपटू रमणदीप सिंग यांनी संघात पुनरागमन केले आहे. १४ ते २८ मे या कालावधीत सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले असून २९ मे रोजी भारतीय संघ जर्मनीसाठी रवाना होणार आहे.

‘‘सुलतान अझलन शाह चषक स्पध्रेनंतर संघात काही बदल करण्याची गरज भासू लागली. यापूर्वी मी सांगितल्याप्रमाणे या वर्षांत तीन दौरे होणार आहेत आणि त्यात युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे आम्ही या संघात अननुभवी खेळाडूंनाही संधी दिली आहे.  बलाढय़ संघांविरुद्ध या खेळाडूंची कामगिरी कशी होते, याची चाचपणी करायची आहे,’’ असे मत मुख्य प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांनी व्यक्त केले.

भारतीय संघ

  • गोलरक्षक : आकाश चिकटे, विकास दहिया.
  • बचावपटू : प्रदीप मोर, कोठाजीत सिंग, सुरेंदर कुमार, रुपिंदरपाल सिंग, हरमनप्रीत सिंग
  • मध्यरक्षक : चिंग्लेनसाना सिंग, एस. के. उथप्पा, सतबीर सिंग, सरदार सिंग, मनप्रीत सिंग, हरजीत सिंग.
  • आघाडीपटू : रमणदीप सिंग, एस.व्ही. सुनील, तलविंदर सिंग, मनदीप सिंग, आकाशदीप सिंग