विश्वचषक आयोजन, प्रक्षेपण हक्क यांच्या संदर्भात फिफाच्या पदाधिकाऱ्यांना झालेल्या अटकेच्या कारवाईचे अर्जेटिनाचा दिग्गज खेळाडू दिएगो मॅराडोनाने स्वागत केले आहे. या कारवाईमुळे फुटबॉलमधील भ्रष्टाचाराची वाळवी दूर होण्यास मदत होईल. भ्रष्टाचारनिर्मूलन मोहिमेचे पुढचे लक्ष्य फिफाचे अध्यक्ष सॅप ब्लाटर असू शकतात, असे त्यांनी पुढे म्हटले आहे. ़ ‘‘अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या पुढच्या कारवाईकडे लक्ष हवे. ब्लाटर आता रडारवर आहेत. गेल्या दहा वर्षांपासून ब्लाटर यांच्याभोवती भ्रष्टाचाराच्या आरोपांचे जाळे आहे.  मी गेली अनेक वर्षे ब्लाटर यांच्याबाबत सातत्याने याच गोष्टी सांगत होतो. पण अनेकांनी माझी थट्टा उडवली. अमेरिका आणि स्विस पोलिसांच्या कारवाईमुळे जगाला सत्य समजले आहे. फुटबॉलविश्वाला काळिमा लावणाऱ्या या दुर्दैवी घटनेनंतरही ब्लाटर अध्यक्षस्थानी येणार का, हे पाहणे उत्सुकतेचे आहे.’’ असे मॅराडोना यांनी म्हटले आहे.