भारतीय संस्कृतीमध्ये गुरूचं महत्त्व अगाध आहे. ‘गुरू साक्षात परब्रह्म’ अशा शब्दांत त्याची महती सांगितली जाते. पण इतिहासाचं हे दायित्व आधुनिक क्रिकेटमध्ये जपणं कठीण झालं आहे. क्रिकेटमधील गुरूची म्हणजेच प्रशिक्षकाची व्याख्या भारताच्या बाबतीत करायची झाली, तर ती अतिशय निराळी होईल. कर्णधाराचं ऐकणारा, संघटनेतील प्रशासकीय मंडळींच्या शब्दाला जागणारा, सल्लागार समितीत असलेल्या पुढील पिढीच्या मंडळींचा आदर करणारा, खेळाडूंना अनिवार्य सराव सत्रांपेक्षा वैकल्पिक सराव सत्रांची संख्या अधिक ठेवणारा, शाळेच्या मुख्याध्यापकाप्रमाणे संघावर शिस्तीचा लगाम न ठेवणारा, उलटपक्षी त्यांना मौजमजा करायला स्वातंत्र्य देणारा असा क्रिकेटजगतासाठी ज्ञात व्यक्ती म्हणजे प्रशिक्षक. भारतीय आणि मुंबईच्या क्रिकेटमधील ताज्या घडामोडींच्या आधारे ही व्याख्या करण्यात आली असली, तरी ती देशातील क्रिकेटसाठी नवखी मुळीच नाही. अनिल कुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघानं वर्षभर विजयी घोडदौड केली, परंतु कर्णधाराला ते नकोसे झाले. तसेच गेली दोन वष्रे संघाला रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम फेरीपर्यंत नेऊनही प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आणि निवड समितीचे प्रमुख मिलिंद रेगे यांना मुंबई क्रिकेट असोसिएशननं दूर केलं.

सध्याच्या युगात व्यावसायिकीरणाला अतिशय महत्त्व आहे. यशाच्या कामगिरीच्या आधारे तुमचं अस्तित्व सिद्ध होतं. कुंबळे आणि पंडित यांची जरी उदाहरणं घेतली तरी यशाची आकडेवारी अगदी संघाला गुणवत्ता यादीत नेणारी. परंतु या मंडळींना देशातील प्रशिक्षकपदाच्या अटी आणि शर्तीचं पालन करता आलं नाही, हीच त्यांची चूक झाली. मग संपूर्ण भारतीय क्रिकेटला वेठीस धरून मनस्वी कोहलीनं कुंबळेचा पत्ता कट केला, तर मुंबई क्रिकेटमधील धुरिणांनी बुद्धिबळाप्रमाणे यशस्वी चाली करीत पंडित आणि रेगे ही प्यादी पटावरून बाद केली. कारण नावडत्या प्रशिक्षकालाही प्रामाणिकपणे स्वीकारायला ही मंडळी ऑलिम्पिक सुवर्णपदकविजेती अभिनव बिंद्रा नक्कीच नव्हती. बिंद्रानं २० वष्रे आपल्याला न आवडणाऱ्या प्रशिक्षकाचं मार्गदर्शन घेतलं. परंतु आताच्या दिवसांमध्ये हे फार थोडय़ांनाच जमू शकतं.

भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक नेमण्याची जबाबदारी क्रिकेट सल्लागार समितीची आहे. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण हे भारतीय क्रिकेटमधील तीन महान क्रिकेटपटू या समितीचं प्रतिनिधित्व करतात. परंतु भारतीय क्रिकेटच्या भल्याचं काय आहे, यापेक्षा संघनायक विराटला काय हवं आहे, हे पाहणंसुद्धा आता त्यांना क्रमप्राप्त आहे. म्हणजे ही समिती खरं तर चार सदस्यांचीच झाली आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. विराटच्या मताला या समितीनं काडीचीही किंमत द्यायची नाही, असं ठरवल्यास तो आलेल्या प्रशिक्षकाची कुंबळेप्रमाणेच गत करू शकतो. म्हणजेच या समितीचं प्रमुखपद हे आपसूकच विराटकडे जातं. दुसऱ्या बाजूनं विचार केल्यास या ‘विराटवृत्ती’ला विरोध दर्शवून सल्लागार समितीनं सन्मानपूर्वक राजीनामा देण्याची गरज आहे.

सल्लागार समिती प्रशिक्षकपदाची निवड करते, परंतु समितीमधील खेळाडू हे पुढच्या पिढीतील असल्यामुळे पुन्हा मान आणि अहंकार प्रक्रियेत अडचणी आणतात. गांगुली आणि माजी क्रिकेट संघ संचालक रवी शास्त्री यांच्यात मागील वर्षी प्रक्रियेच्या वेळी झालेला वाद प्रसारमाध्यमांमध्ये जगजाहीर करण्याची काळजी शास्त्रीनं जाणीवपूर्वक घेतली.

क्रिकेट मंडळावरील पदाधिकारी ज्या विचारधारेचे किंवा पॅनेलचे त्यांच्या सुरात सूर मिसळणारा प्रशिक्षक किंवा निवड समिती सदस्य निवडला जातो, ही परंपरा वर्षांनुवष्रे जपली जात आहे. क्रिकेटचं भलं महत्त्वाचं, असं मानणारे प्रशासक यात क्वचितच सापडतात. राजसिंग डुंगरपूर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष असताना मोहम्मद अझरुद्दीनची, तर जगमोहन दालमिया यांच्या पाठबळामुळे सौरव गांगुलीची ‘दादागिरी’ चालायची. मग एन. श्रीनिवासन यांनी बीसीसीआयची सूत्रं सांभाळल्यानंतर महेंद्रसिंग धोनीचं राज्य सुरू झालं. आता विराट उत्तरेचं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो आहे. नुकतंच राहुल द्रविडनं धोनी आणि युवराज सिंग यांना भारताच्या २०१९च्या विश्वचषक संघासाठी अयोग्य ठरवलं आहे. धोनी आणि युवी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेच्या भारतीय संघातसुद्धा नसते तरी चाललं असतं, असं क्रिकेट अभ्यासकांचं म्हणणं आहे.

भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी या साऱ्या नाटय़ावर तोफ डागताना आता विराट आणि कंपनीलाच प्रशिक्षक निवडायला सांगा असं म्हटलं होतं, तर दुसऱ्या दिवशी ज्या खेळाडूंना बीसीसीआयचे निर्णय मान्य नसतील त्यांना हाकलून द्या, अशी सूचना केली होती.

काही दिवसांपूर्वी प्रख्यात इतिहासतज्ज्ञ रामचंद्र गुहा यांनी बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचा राजीनामा देताना भारतीय क्रिकेटमधील सद्य:स्थितीवर बोट ठेवले होते. भारताच्या क्रिकेटमध्ये खेळाडूंची ‘सुपरस्टार’ संस्कृती कार्यरत आहे, ती खेळासाठी हानिकारक ठरत आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. गुहा यांच्या राजीनाम्याचाही कुंबळे प्रकरणाशी संबंध आहे. लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी सुरू असतानाही अद्याप काही आजी-माजी खेळाडूंचे हितसंबंध कशात गुंतले आहेत, हे त्यांनी थेट मांडलं होतं.

भारतीय क्रिकेटमधील प्रस्थापित रचनेनं कुंबळे, पंडित आणि रेगे यांचे बळी घेतले आहेत, हे सत्य आता लपून राहिलेलं नाही. परंतु त्यामुळे प्रशिक्षकाचं महत्त्व कालांतरानं दुय्यम होऊ लागलं आहे, हे वास्तवसुद्धा आता अधोरेखित झालं आहे. साधं प्रशिक्षक आणि खेळाडू यांचं मानधन, पुरस्काराची रक्कम अशी आकडेवारी ठरवतानाही त्यांच्यावर देशात अन्यायच होत असतो. त्यामुळे मान आणि धन या दोन्ही बाबतीत हा गुरू केवळ नावाला उरला आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. तूर्तास देशातील क्रिकेटला या घटना आणखी कोणते दिवस दाखवणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

प्रशांत केणी

prashant.keni@expressindia.com