लंडन स्टेडियमवर मागील रविवारी जे घडले, ते चित्र अजूनही क्रीडारसिकांच्या डोळ्यांसमोर आहे. उसेन बोल्ट आणि मो फराह हे जगातील दोन महान धावपटू अ‍ॅथलेटिक्स ट्रॅकवर पडून ढसाढसा रडत होते. त्यांच्या पाणावलेल्या नयनांनी उपस्थित प्रेक्षकांच्याही डोळ्यांत आसवे आणली. दूरचित्रवाणीसमोर बसलेले लाखो-कोटय़वधी चाहतेही त्या क्षणी स्तब्ध झाले. कारण तो क्षणच भावनिक होता. गेली ९-१० वष्रे क्रीडाप्रेमींचे निखळ मनोरंजन करणारे आणि प्रतिस्पर्धीच्या मनात आदरयुक्त भीती निर्माण करण्यात यशस्वी झालेले हे दिग्गज धावपटू जागतिक स्पध्रेत अखेरचे सहभागी झाले होते. जिंकल्यानंतरचा आनंद साजरा करण्याची त्यांची ती मुद्रा जगभरातील क्रीडा चाहत्यांमध्येही लोकप्रिय झाली. बोल्टचे ते एक हात आकाशाच्या दिशेने उंचावणे आणि फराहचे ते दोन्ही हातांची बोटे डोक्यावर ठेवणे, ही जणू आनंद साजरा करण्याची शैलीच बनली. त्यांची ही विजयीमुद्रा पुन्हा प्रत्यक्ष पाहण्याची संधी आता मिळणार नाही. त्यामुळे कारकीर्दीतील अखेरच्या स्पध्रेत ही ‘विजयीमुद्रा’ डोळ्यात साठवण्यासाठी लंडन स्टेडियमवर जनसागर लोटला होता, परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

५००० मीटर शर्यतीत मो फराहला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर ४ बाय १०० मीटर शर्यतीत जेतेपदासाठी धाव घेतलेल्या बोल्टला दुखापतीमुळे विव्हळत ट्रॅकवर लोटांगण घालावे लागले. पाठोपाठ लागलेल्या या दोन्ही निकालांनी सर्वाचीच मने हेलावली. जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पध्रेचे बिगूल वाजले त्याही आधीपासून बोल्ट आणि फराह यांच्याच नावाची चर्चा होती. गेली काही वष्रे उत्तेजक सेवनांच्या प्रकरणांमुळे मैदानी स्पध्रेबाबत लोकांच्या मनात संशयास्पद वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे या स्पर्धामधील उत्साहही मावळला होता, परंतु बोल्ट आणि फराहने अखेरच्या स्पध्रेत तो उत्साह पुन्हा निर्माण करून निरोप घेतला.

अमेरिकेचे कार्ल लुईस (१९८३-९३), मिचेल जॉन्सन (१९९१-९९) आणि मॉरिस ग्रिने (१९९७-२००१) यांच्यानंतर ट्रॅक प्रकारात वर्चस्व गाजवले ते उसेन बोल्टने. ते वर्चस्व इतके प्रभावशाली आहे की पुढील अनेक पिढय़ांसाठी ते प्रेरणादायी तर आहेच, तसेच त्याने प्रस्थापित केलेले विक्रम मोडणे अशक्यच आहेत. बोल्टच्या अखेरच्या शर्यतीनंतर समाजमाध्यमांवर एक चित्रफीत फिरत होती. बोल्टच्या कारकीर्दीचा आढावा घेणारी ती चित्रफीत इतकी बोलकी होती की ती कुणालाही वारंवार बघत राहण्याचा मोह होईल.

लहानपणाचा खोडकर बोल्ट. फुटबॉलची प्रचंड आवड असलेला. जमैकाच्या गल्लीबोळातून सुसाट पळणारा.. आणि त्यानंतर जगातील वेगवान धावपटू म्हणून त्याचे झालेले रूपांतर.. हा प्रवास फार अचंबित करणारा आहे.. जमैकाच्या लहानशा गावात किराणा मालाचे दुकान चालवणाऱ्या दाम्पत्याचा मुलगा आज जगासाठी स्वत:च एक ब्रँड झाला आहे. कोण कुठला बोल्ट २००८च्या बीजिंग ऑलिम्पिक स्पध्रेत पदार्पण करतो काय आणि त्यानंतर दहा वष्रे सुवर्णपदकावर अधिराज्य गाजवतो काय..! २००७च्या ओसाका येथे झालेल्या जागतिक स्पध्रेत रौप्यपदकावर समाधान मानावे लागल्यानंतर जागतिक स्पध्रेतील बोल्टची कामगिरी ही दिवसेंदिवस उंचावत गेली. ऑलिम्पिक स्पध्रेतील आठ सुवर्णपदके, तर जागतिक स्पध्रेतील  १००, २०० आणि ४ बाय १०० रिले शर्यतीची अशी एकूण १४ पदके बोल्टच्या नावावर आहेत. त्यामुळेच जागतिक स्पध्रेत सर्वात यशस्वी पुरुष धावपटूंमध्ये तो आघाडीवर आहे.

मो फराहही लांब पल्ल्याच्या शर्यतीचा सम्राटच आहे. बोल्ट युगात जन्मल्याने त्याला फार प्रसिद्धी लाभली नाही, एवढेच. इथिओपियाचा केनेनिसा बेकेलेनंतर ५००० आणि १०००० मीटर शर्यतीत फराहाचाच दबदबा राहिला. बेनेके यांनी २००३ ते २००९ या कालावधीत वर्चस्व गाजवले आणि त्यांच्यानंतर म्हणजेच २०११ ते २०१७ पर्यंत फराहयुग होते. सोमालिया येथे जन्मलेला फराह वयाच्या आठव्या वर्षी ब्रिटनमध्ये स्थायिक झाला आणि त्याच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली. रिओ ऑलिम्पिकमध्ये लांब पल्ल्याच्या शर्यतीत सुरुवातीला ट्रॅकवर कोसळल्यानंतरही उठून त्याने जिंकलेले सुवर्णपदक हे अविस्मरणीय होते. त्यामुळे फराह अधिक लक्षात राहतो. अखेरच्या जागतिक स्पध्रेची त्याची सांगता अपेक्षेप्रमाणे झाली नाही, परंतु १०००० मीटर शर्यतीचे सुवर्णपदक जिंकून त्याने ऐतिहासिक कामगिरीची नोंद नक्की केली. मो फराह, व्हॅडे व्हॅन निएकेर्क, सॅली पिअरसन या दिग्गजांनी सुवर्णपदक जिंकले, तर काही युवा खेळाडूंनी पदार्पणातच आपली छाप सोडली. त्यामुळे ही जागतिक स्पर्धा बोल्ट आणि फराहयुगाचा अस्त असली तरी नव्या पर्वाची सुरुवातही आहे. येणाऱ्या काळात बोल्ट आणि फराह यांची जागा घेणारे खेळाडू मिळणे कठीण असले तरी त्यांच्या जाण्याने रिकामी झालेले स्थान काही अंशी भरून काढणारे युवा खेळाडू नक्की मिळतील.

 

स्वदेश घाणेकर

swadesh.ghanekar@expressindia.com