भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि केदार जाधव यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना जिंकला. भारतीय संघाने या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडच्या ३५१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची ४ बाद ६४ अशी केविलवाणी अवस्था असताना कोहलीने कर्णधारी खेळी साकारून संघाला विजय प्राप्त करून दिला. कोहलीने १२२ धावांची खेळी साकारली. कोहलीच्या या दमदार खेळीनंतर संपूर्ण क्रिकेट जगतात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. दबावाखाली चांगली कामगिरी करण्याच्या कोहलीच्या कौशल्याची प्रशंसा करण्यात आली. कोहलीने या शतकासह एकदिवसीय क्रिकेट करिअरमधील आपले २७ वे शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे, धावांचा पाठलाग करताना कोहलीचे हे १७ वे शतक ठरले. सचिन तेंडुलकरनेही आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत धावांचा पाठलाग करताना एकूण १७ शतके ठोकली होती. त्यानंतर पु्न्हा एकदा सचिन आणि कोहली यांची तुलना करण्यास सुरूवात झाली. धावांचा पाठलाग करताना सचिनने ठोकलेली १७ शतके २३२ इनिंग्जमध्ये केली. तर कोहलीने ही कामगिरी केवळ ९६ सामन्यांमध्ये केली आहे.

वाचा: ‘कोहलीपेक्षा सचिन कितीतरी पटीने चांगला खेळाडू’

 

कोहलीच्या कामगिरीचे कौतुक इंग्लंडचे माजी फलंदाज मार्क बचर यांनी देखील केले. ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत मार्क बचर यांनी कोहलीच्या फलंदाजीत मला कोणत्याही प्रकारच्या त्रुटी आढळून येत नाहीत असे म्हटले. ते म्हणाले की, “इंग्लंडच्या सर्व खेळाडूंसमोर सध्या एकच प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे विराट कोहलीला रोखायचे कसे? कोहलीने आपल्या सातत्यूपूर्ण कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याला थांबवणं खरंच अशक्य आहे. मला विराटच्या फलंदाजीत कोणतीही कमकुवत बाजू दिसत नाही. कर्णधार इऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घ्यावा आणि भारताच्या आव्हानाचा पाठलाग करावा”

वाचा: विराटने ‘बटर चिकन’ खाणं सोडलं!