गुणवान फलंदाज जो बर्न्‍सला कसोटी पदार्पणाची संधी अनपेक्षितपणे चालून आली आहे. २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या १३ सदस्यीय संघात अष्टपैलू मिचेल मार्शच्या जागी त्याचा समावेश करण्यात आला आहे.
‘‘ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय निवड समितीने क्वीन्सलँडचा क्रिकेटपटू जो बर्न्‍सचा संघात समावेश केला आहे,’’ असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पत्रकाद्वारे कळवले आहे. ‘‘मार्श दुखापतीने त्रस्त असल्यामुळे त्याची जागा २५ वर्षीय बर्न्‍स घेऊ शकेल. बर्न्‍स पहिल्या ते सहाव्या क्रमांकापर्यंत कोणत्याही स्थानावर फलंदाजी करू शकेल. डेव्हिड वॉर्नरच्या अंगठय़ाची दुखापत फारशी गंभीर नसून, तो तिसऱ्या कसोटीसाठी तंदुरुस्त आहे, असे ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी सांगितले.
यंदाच्या हंगामात शेफिल्ड शिल्डमध्ये बर्न्‍सने आपल्या सातत्यपूर्ण फलंदाजीचा प्रत्यय घडवला आहे. त्याने ५५च्या सरासरीने ४३९ धावा काढल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४२.५४च्या सरासरीने त्याच्या खात्यावर २९७८ धावा आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या मागील चार कसोटी सामन्यांत मिचेल मार्शने प्रतिनिधित्व केले आहे, परंतु गेली दोन वष्रे मांडीच्या स्नायूच्या दुखापतीमुळे तो त्रस्त आहे. रयान हॅरिससुद्धा अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही, परंतु मेलबर्न कसोटीसाठी त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत सध्या ऑस्ट्रेलियाकडे २-० अशी आघाडी आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ :
स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ख्रिस रॉजर्स, शेन वॉटसन, शॉन मार्श, जो बर्न्‍स, ब्रॅड हॅडिन, मिचेल जॉन्सन, मिचेल स्टार्क, नॅथन लिऑन, जोश हॅझलवूड, रयान हॅरिस, पीटर सिडल.