ब्राझीलमध्ये २०१४ साली रंगणाऱ्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या तयारीसाठी आणि संघ बांधणीसाठी अनेक संघांची तयारी सुरू असली तरी या फुटबॉलमधील या मोसमावर थरार, उत्कंठा आणि वर्चस्ववादाची मोहोर उमटली. सध्याच्या काळातील महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने संपूर्ण मोसमावर दबदबा गाजवला तर स्पेनने सलग दुसऱ्यांदा युरो चषकावर नाव कोरण्याची करामत केली. पाच वेळा फिफा विश्वचषकाला गवसणी घालणाऱ्या ब्राझीलचे ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न या वेळीही पूर्ण होऊ शकले नाही.
चेल्सीचे पहिले चॅम्पियन्स लीग जेतेपद
इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये सहाव्या क्रमांकावर समाधान मानावे लागल्यानंतर चेल्सीने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या १०७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा जेतेपदावर नाव कोरले. प्रशिक्षक रॉबेटरे डी मटेओ यांनी प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचे भाग्य उजळले. बायर्न म्युनिचसारखा तगडा प्रतिस्पर्धी समोर असल्यामुळे चेल्सी जेतेपद पटकावेल, यावर कुणाचाही विश्वास नव्हता. सामना संपायला काही मिनिटे शिल्लक असताना थॉमस म्युलरने बायर्न म्युनिचचे खाते खोलले. पण दिदियर द्रोग्बा याने ८८व्या मिनिटाला चेल्सीला बरोबरी साधून दिली. सामना पेनल्टी-शूटआऊटमध्ये गेल्यानंतर अगदी रोमहर्षक अवस्थेत चेल्सीने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये रंगलेला थरार
१२वेळा विजेत्या ठरलेल्या मँचेस्टर युनायटेड आणि मँचेस्टर सिटी यांच्यात जेतेपद पटकावण्यासाठी अखेरच्या सामन्यात चांगलाच थरार पाहायला मिळाला. इंग्लिश प्रीमिअर लीगच्या इतिहासात पहिल्यांदाच गोलफरकाच्या आधारावर विजेतेपदाचा निकाल लागला. जेतेपद पटकावण्यासाठी मँचेस्टर सिटी आणि मँचेस्टर युनायटेडला मोठय़ा फरकाने विजय मिळवणे गरजेचे होते. त्यापैकी युनायटेडने विजयाची नोंद करून सिटीला आव्हान दिले. क्विन्स पार्क रेंजर्सविरुद्धच्या सामन्यात सिटी संघ २-२ अशा बरोबरीत असताना सर्जीओ अ‍ॅग्युरोने अतिरिक्त वेळेत गोल करून सिटीला ४४ वर्षांनंतर पहिल्यांदा इंग्लिश प्रीमिअर लीगचे जेतेपद मिळवून दिले.
युरो चषकावर स्पेनचे वर्चस्व
सलग दुसऱ्यांदा युरो चषकावर नाव कोरण्यासाठी स्पेनसमोर आव्हान होते ते इटलीच्या मारिओ बालोटेलीचे. पण अंतिम फेरीत बालोटेली अपयशी ठरला आणि स्पेनने पूर्णपणे हुकुमत गाजवत ४-० असा दणदणीत विजय मिळवला. युरो चषक (२००८), फिफा विश्वचषक (२०१०) आणि युरो चषक (२०१२) या सलग तीन प्रतिष्ठेच्या स्पर्धाची जेतेपदे पटकावणारा स्पेन हा पहिला संघ ठरला. संथ खेळ करणारा संघ, अशी टीका करणाऱ्या स्पेनने सर्व टीकाकारांचे दात त्यांच्याच घशात घातले.
ऑलिम्पिक सुवर्णपदकाची
 ब्राझीलची प्रतीक्षा कायम
‘नवीन पेले’ अशी ओळख मिळालेला नेयमार हा लंडन ऑलिम्पिकमध्ये ब्राझीलचे ऑलिम्पिक सुवर्णपदकाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारेल, अशी अपेक्षा होती. पण अंतिम फेरीत नेयमारची जादू चाललीच नाही. ओरिबे पेराल्टा याने दोन गोल करत मेक्सिकोला आघाडीवर आणले होते. ९०व्या मिनिटाला ब्राझीलच्या हल्क याने गोल केला, पण तोपर्यंत ब्राझीलचा पराभव निश्चित झाला होता. त्यानंतर मॅनो मेनेझेस यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली आणि लुइस फिलिप स्कोलारी यांना पुन्हा प्रशिक्षकपदी बोलावण्यात आले. आता ऑलिम्पिक सुवर्णपदकासाठी ब्राझीलला मायदेशात २०१६साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.
लिओनेल मेस्सीची विक्रमी कामगिरी
एका कॅलेंडर वर्षांत ८५ गोल रचण्याचा गेर्ड म्युलर यांचा ४० वर्षांपूर्वीचा विक्रम लिओनेल मेस्सी याने मोडला. इतकेच नव्हे तर ९१ गोल झळकावण्याची किमया त्याने साधली. क्लबतर्फे सुरेख कामगिरी करणारा मेस्सी राष्ट्रीय संघातर्फे खेळताना मात्र चाचपडतो, अशी टीका त्याच्यावर काही वर्षांपासून होत होती. पण अर्जेटिनासाठी तब्बल १२ गोल त्याने लगावले. त्यात स्वित्र्झलड आणि ब्राझीलविरुद्ध हॅट्ट्रिकही त्याने साजरी केली. त्याच्या या कामगिरीमुळे बार्सिलोनाने स्पॅनिश लीग जेतेपद पटकावण्याच्या दिशेने कूच केली आहे.
भारतीय फुटबॉलसाठी संमिश्र वर्ष
पेनल्टी-शूटआऊटमध्ये कॅमेरून ‘ब’ संघाचा ४-५ असा पराभव करून भारतीय संघाने मायदेशात झालेल्या नेहरू चषक स्पर्धेत जेतेपदाची हॅट्ट्रिक साजरी केली. मात्र जेतेपदानंतरही भारतीय फुटबॉल संघाच्या फिफा क्रमवारीत फारसा फरक पडला नाही. भारतीय संघाची १६९व्या क्रमांकावर घसरण झाली. नेपाळमध्ये झालेल्या एएफसी चॅलेंज चषक स्पर्धेत भारतीय संघाने सुमार कामगिरी केली. ताजिकिस्तान, फिलिपाइन्स आणि उत्तर कोरिया या संघांकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे भारताचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. भारताला एकही गोल करता आली नाही, ही नामुष्कीची बाब म्हणावी लागेल. भारतीय फुटबॉलमधील सर्वात वाईट घटना याच वर्षी ९ डिसेंबरला घडली. पंचांनी मोहन बागानच्या निर्मल छेत्रीला पिवळे कार्ड दाखवल्यानंतर संतापलेल्या ओकोली ओडाफे याने पंचांना अपशब्द वापरले. चाहत्यांनीही पंचांच्या दिशेने जे मिळेल ते भिरकावण्यास सुरुवात केली. गॅलरीतून मारलेला विटेचा तुकडा बागानच्या सय्यद रहीम नाबीच्या गालावर लागला. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मोहन बागानच्या खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणास्तव खेळण्यास नकार दिला. कोलकात्याच्या मोहन बागानवर बंदीची टांगती तलवार लटकत असून नाबीची तब्येत अद्याप सुधारलेली नाही.