केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी भरीव तरतूद केली आहे. २०१५-१६चा वार्षिक अर्थसंकल्प सादर करताना युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयासाठी सुमारे ३८४ कोटी रुपयांची वाढ केली आहे.
लोकसभेत शनिवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात जेटली यांनी युवा आणि क्रीडा खात्यासाठी १५४१.१३ कोटींची तरतूद केली आहे. यापैकी १३८९.४८ कोटी हे नियोजित खर्चासाठी असतील, तर १५१.६५ हे अनियोजित खर्चासाठी असतील. गेल्या वर्षी या विभागासाठी ११५६.६१ कोटींची तरतूद केली होती. नियोजित खर्चाच्या तरतुदीत ३८१ कोटींची आणि अनियोजित खर्चाच्या तरतुदीत ३.०४ कोटींची वाढ झाली आहे.
एकंदर तरतुदीपैकी ८८६.५७ कोटी रुपये क्रीडा आणि स्पर्धासाठी असतील. गतवर्षी हा आकडा ६४२.६८ कोटी रुपये होता. तथापि, युवा कल्याण कार्यक्रमासाठी ३३६.६२ कोटी रुपये बाजूला ठेवण्यात आले आहेत.
सिक्किम आणि उत्तर-पूर्वेकडील भागातील विकास योजनांसाठी या खात्याला १५१.२३ कोटी रुपये देण्यात आले आहेत. भारतीय क्रीडा प्राधिकरणासाठी केलेल्या तरतुदीमध्ये १७.३४ कोटी रुपयांनी वाढ करण्यात आली असून, हा आकडा आता ३६९.३९ कोटी रुपये करण्यात आला आहे.
उत्तेजक द्रव्य पदार्थाविरोधातील योजनांसाठी १२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यापैकी ८.९ कोटी रुपये राष्ट्रीय उत्तेजक
चाचणी प्रयोगशाळेला देण्यात येणार आहेत.