सामना अनिर्णित तरी मुंबई उपांत्यपूर्व फेरीत

सावध पवित्रा घेत सलग दुसऱ्या विजयाची संधी मुंबईने गमावली असली तरी पहिल्या डावातील आघाडीच्या

क्रीडा प्रतिनिधी, नवी मुंबई | January 2, 2013 04:43 am

सावध पवित्रा घेत सलग दुसऱ्या विजयाची संधी मुंबईने गमावली असली तरी पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर तीन गुण मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. अखेरच्या दिवशी गुजरातच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी करीत ३३७ धावा केल्या, यावेळी मुंबईपुढे विजयासाठी १३५ धावांचे आव्हान होते, पण विजयासाठी प्रयत्न न करता मुंबईने सामना अनिर्णित राखण्यातच धन्यता मानली. मुंबईला २७ षटकांत फक्त ६५ धावा करता आल्या.
गुजरातच्या मनप्रीत जुनेजा आणि चिराग गांधी यांनी अप्रतिम फलंदाजी करीत मुंबईची गोलंदाजी बोथट करण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी रचत गुजरातला स्थैर्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला.
झहीरच्या अनुपस्थितीत मुंबईची गोलंदाजी भेदक वाटलीच नाही. जुनेजाचे शतक या वेळी फक्त दोन धावांनी हुकले, त्याने ११ चौकारांच्या मदतीने ९८ धावांची खेळी साकारली. चिरागने त्याला अप्रतिम साथ देत १३ चौकारांच्या मदतीने ६४ धावा फटकावल्या. तळाचा फलंदाज रुश कलारिया याने ३९ चेंडूंत ५ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४३ धावांची खेळी साकारत गुजरातचा धावफलक फुगवण्याचा प्रयत्न केला. मुंबईकडून या वेळी डावखुरा फिरकीपटू अंकित चव्हाणने चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
जुनेजा, चिराग आणि कलारिया यांच्या उपयुक्त खेळींच्या जोरावर गुजरातने दुसऱ्या डावात ३३७ धावांपर्यंत मजल मारली.
मुंबईला विजयासाठी १३५ धावांची गरज असताना गुजरातच्या गोटात चिंतेचे वातावरण होते. पण तीन गुण मिळवून उपांत्यपूर्व फेरी गाठल्यावरच मुंबईने समाधान मानले. त्यांनी विजयासाठी प्रयत्नच केले नाहीत. आदित्य तरेला (७) मुंबईने लवकर गमावले, पण त्यानंतर कौस्तुभ पवार आणि हिकेन शाह यांनी दिवस खेळून काढण्यात धन्यता मानली. कौस्तुभने यावेळी ८८ चेंडूंत २ चौकारांनिशी नाबाद १५ धावा केल्या, तर हिकेनने ५४ चेंडूंत ८ चौकारांनिशी नाबाद ४२ धावांची खेळी साकारत विजयाच्या जवळपास जाण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले खरे, पण समोरच्या टोकाकडून कौस्तुभची त्याला अपेक्षित साथ लाभली नाही.
संक्षिप्त धावफलक
गुजरात : २४४ आणि ३३७ (मनप्रीत जुनेजा ९८, चिराग गांधी ६४; अंकित चव्हाण ४/१२४)मुंबई : ४४७ आणि ६५/१ (हिकेन शाह नाबाद ४२; कुशांग पटेल १/१८)

First Published on January 2, 2013 4:43 am

Web Title: match tiesbut mumbai is in semi final