राजकारणी आणि उद्योगपती यांच्या प्रवेशामुळे क्रिकेटची वाताहत झाल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या लोढा समितीने व्यक्त केले होते. पण मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष शरद पवार यांना मात्र असे वाटत नाही. लोढा समितीवर चर्चा करण्यासाठी एमसीएच्या कार्यकारिणीची बैठक बुधवारी बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर पवार म्हणाले की, ‘‘एक गोष्ट स्पष्ट आहे की, प्रशासकांमुळे क्रिकेटवर ही वेळ आलेली नाही.’’
लोढा समितीच्या तीन सदस्यांनी १५९ पानांचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाला पाठवला आहे. त्यांच्या अहवालात ७० वर्षांवरील व्यक्ती क्रिकेट प्रशासनामध्ये कोणतेही पद भूषवू शकत नाही, असे म्हटले आहे. पवार यांनी ७५ वर्षे पूर्ण केली असून या शिफारशींची अंमलबजावणी करण्याची वेळ आली तर पवार यांना एमसीएचे अध्यक्षपद गमवावे लागणार आहे.
‘‘एमसीएच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये लोढा समितीच्या शिफारशींवर चर्चा करण्यात आली. याबाबतची मते आम्ही बीसीसीआयला कळवणार आहोत,’’ असे एमसीएचे संयुक्त सचिव पी. व्ही. शेट्टी यांनी सांगितले.