आंतर-शालेय आणि आंतर-महाविद्यालयीन स्पर्धामध्ये १५ खेळाडूंना खेळण्याची संधी द्यावी, अशी भूमिका भारताचा माजी  क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने मांडली होती. आपल्या या भूमिकेबाबत सचिन आग्रही असून या फॉम्र्युल्यावर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) १४ ऑक्टोबरला होणाऱ्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे.
शाळेतील आणि महाविद्यालयांतील मुलांना खेळण्याची संधी मिळाली नाही तर ते निराश होऊन क्रिकेट सोडून देतात; पण हे टाळण्यासाठी आंतर-शालेय आणि आंतर-महाविद्यालयीन स्पर्धामध्ये १५ खेळाडूंना खेळण्याची संधी द्यावी, असे सचिनने एका कार्यक्रमामध्ये सांगितले होते. यावर एमसीएच्या तांत्रिक समितीमध्ये चर्चा झाली होती; पण याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येत नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन आपल्या या भूमिकेबाबत आग्रही होता. एमसीएच्या तांत्रिक समितीने दोनदा हा प्रस्ताव नामंजूर केल्यावर सचिनने थेट एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांना गळ घातली आणि पवारांनी एमसीए पदाधिकाऱ्यांना याबाबत चर्चा करण्यास सांगितले. सचिनच्या या भूमिकेवर एमसीएच्या आगामी बैठकीमध्ये चर्चा होणार असून यामधून आंतर-शालेय आणि आंतर-महाविद्यालयीन क्रिकेटमध्ये सकारात्मक बदल घडतील, अशी आशा क्रिकेटरसिकांना आहे.

एस.पी. ग्रुपचा जुनाच फॉम्र्युला
खेळाडूंना अधिकाधिक संधी मिळावी यासाठी प्रशिक्षक संगम लाड यांनी एस.पी. ग्रुपच्या आंतर-महाविद्यालयीन, आंतर-क्लब्ज आणि कॉर्पोरेट क्रिकेट क्रिकेट स्पर्धामध्ये असाच फॉम्र्युला गेल्या आठ वर्षांपासून वापरला आहे. यामध्ये दोन्ही संघांना १४ खेळाडू खेळवण्याची मुभा त्यांनी दिली आहे. सामन्यादरम्यान प्रशिक्षकांचा कर्णधारावर प्रभाव कमी असावा, जेणेकडून चांगले कर्णधार निर्माण होतील. त्याचबरोबर क्रिकेट अधिक स्पर्धात्मक व्हावे, हा यामागचा मानस होता. या फॉम्र्युल्यानुसार गोलंदाजी करताना १५ आणि ३० षटकांनंतर क्षेत्ररक्षण करणाऱ्या कर्णधाराला खेळाडू बदलता येतील. आदित्य तरे, सूर्यकुमार यादव, सिद्धेश लाड, कौस्तुभ पवार, विशाल दाभोळकर या रणजी खेळाडूंनी या एस.पी. ग्रुपच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता.