प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर कर्णधार विराट कोहलीवर सध्या भारतीय चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. रवी शास्त्रींना परत प्रशिक्षकपदावर आणण्यासाठीच कोहलीने ही खेळी केल्याच्या बातम्या अनेक वृत्तपत्रांनी केल्या होत्या. ज्यावर काल रवी शास्त्रींनी आपण प्रशिक्षकपदासाठी अर्ज भरणार असल्याचं सांगत, ही बाब आणखीनचं स्पष्ट केली. पण अनिल कुंबळेंची प्रशिक्षकपदावरुन झालेली अपमानास्पद एक्झीट एका इंजिनीअरला चांगलीच खटकली आहे. त्यामुळे विराट कोहलीला धडा शिकवण्यासाठी त्याने भारतीय प्रशिक्षकपदासाठी अर्ज केल्याचं समजतंय.

उपेंद्रनाथ ब्रम्हचारी असं या मॅकेनिकल इंजिनीअरचं नाव आहे. कुंबळेंच्या राजीनाम्यासाठी कोहली हाच कारणीभूत आहे, त्यामुळे त्याला ताळ्यावर आणण्याकरता आपण अर्ज केल्याचं ब्रम्हचारी याने म्हणलंय. बीसीसीआयकडे आलेल्या अर्जात ब्रम्हचारी यांनी कोहलीबद्दल आपली नाराजी उघड व्यक्त केली आहे. ”कोहलीला कोणत्याही महान क्रिकेटपटूची प्रशिक्षक म्हणून गरज नाहीये. उद्या क्रिकेट सल्लागार समितीने कोणाचीही निवड केली तरीही कोहली त्याचा असाच अपमान करणार आहे, आणि त्या प्रशिक्षकाची अवस्थाही पुढे जाऊन कुंबळेंसारखीच होईल.” असं ब्रम्हचारी याने म्हणलंय.

ब्रम्हचारी यांचा अर्ज हा फारच विनोदी असल्याचं बीसीसीसीआयमधल्या काही सुत्रांनी सांगितलं आहे. तसेच या अर्जात अनेक चुका असल्याचही कळतंय. ”मी अहंकारी व्यक्तीशी जुळवून घेऊ शकतो, जे महान क्रिकेटपटू करु शकणार नाहीत. त्यामुळे क्रिकेटचा कोणताही अनुभव नसला तरीही कोहलीला मीच ताळ्यावर आणू शकतो”, असं या अर्जात म्हणलंय.ब्रम्हचारी यांच्या अर्जाचा विचार बीसीसीआय करेल याची शक्यता जरा कमीच असली, तरीही क्रिकेटपटूं व्यतिरीक्त प्रशिक्षकपदासाठी अर्ज करुन उपेंद्रनाथ ब्रम्हचारी सध्या सोशल मीडियावर चांगलेच ट्रेंड होत आहेत.