अखेर तो क्षण येऊन ठेपला आहे. मजल दरमजल करत जर्मनी आणि अर्जेटिना या दोन संघांनी अंतिम फेरीत स्थान पटकावले आहे आणि आता त्या झळाळत्या चषकावर नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. प्रदीर्घ प्रवास करून या दोन्ही संघांनी हा टप्पा गाठला आहे. जेतेपद केवळ एका विजयाच्या अंतरावर आहे. जर्मनीने याआधी तीनदा तर अर्जेटिनाने दोनदा विश्वविजेतेपदावर कब्जा केला आहे. मात्र त्या गौरवशाली क्षणाला उलटून असंख्य वर्षे लोटली आहेत. आधुनिक काळात म्हणजे तंत्रज्ञानाधिष्ठित वेगवान फुटबॉलच्या कालखंडात जेतेपदावर कब्जा करण्यासाठी दोन्ही संघ आसुसलेले आहेत. कोटय़वधी चाहत्यांच्या अपेक्षा या ११ खेळाडूंवर केंद्रित झाल्या आहेत. कोणाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारणार आणि कोणाचे स्वप्न धुळीस मिळणार हे २४ तासांत स्पष्ट होईल. मात्र एक नक्की, प्रत्येक अडथळा मेहनतीच्या आणि जबरदस्त कौशल्यपूर्ण प्रदर्शनाच्या जोरावर पार करणाऱ्या दोन संघांमध्ये अंतिम मुकाबला होतो आहे. स्पर्धेपूर्वीच जेतेपदाच्या संभाव्य दावेदारांमध्ये या दोन संघांचा समावेश होता. अंतिम लढतीपर्यंत पोहोचत या दोन्ही संघांनी चाहत्यांचा विश्वास आणि मने जिंकली आहेत, आता एकच ध्यास दोन्ही संघांनी जोपासला आहे तो म्हणजे विश्वविजेतेपदाचा.
अर्जेटिना संपूर्ण स्पर्धेत लिओनेल मेस्सीचा संघ म्हणून वावरला आहे. अंतिम लढतही त्याला अपवाद नाही. कुठल्याही परिस्थितीत, प्रतिस्पर्धी संघाचा बचाव कितीही अभेद्य असला तरी गोल करण्याची अद्भुत क्षमता हे मेस्सीचे गुणवैशिष्टय़ आहे. मेस्सीने आपला क्लब बार्सिलोनाला अनेक महत्त्वाच्या स्पर्धाची जेतेपदे जिंकून दिली आहेत. अर्जेटिनाच्या विजयातही निर्णायक भूमिका बजावली आहे. मात्र ‘विश्वविजेतेपदाचा शिल्पकार’ ही बिरुदावली त्याच्या नावावर नाही. दिएगो मॅराडोनाने आपले महानत्व अर्जेटिनाला विश्वचषक जिंकून देत सिद्ध केले आहे. मॅराडोनाप्रमाणे आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची मेस्सीला संधी आहे. अर्जेटिना आणि जगभरातल्या चाहत्यांनी फुटबॉलमध्ये मॅराडोनापर्व अनुभवले आहे. अर्जेटिनाने विश्वचषकावर नाव कोरल्यास मेस्सीपर्वाचा उदय होण्याची शक्यता आहे. मेस्सीभोवती अर्जेटिनाचे डावपेच केंद्रित आहेत. मेस्सीचा अपवाद वगळता तेवढय़ा दर्जाचा एकही मोठा खेळाडू अर्जेटिनाकडे नाही. मर्यादित गुणवत्तेच्या खेळाडूंना घेऊन प्रशिक्षक अलेजांड्रो सबेला यांनी संघबांधणी केली आहे. मेस्सीला उत्तम साथ देत, प्रसंगी वैयक्तिक चांगला खेळ करत अर्जेटिनाने एक संघ म्हणून परिपक्वता दाखवली आहे. जर्मनीसारख्या सर्वसमावेशक संघाविरुद्ध त्यांच्या कौशल्याचा कस लागणार आहे.
सर्वसमावेशक आणि जबरदस्त सांघिक प्रदर्शनाच्या जोरावर जर्मनीने जिंकणे सोपे करून दाखवले आहे. प्रत्येक संघाचा आणि खेळाडूचा त्यांनी सखोल अभ्यास केला आहे. त्यांचे सगळे खेळाडू फॉर्मात आहेत. यजमान ब्राझीलला चीतपट केल्यानंतरही त्यांच्या वावरण्यात गर्व नव्हता. यातच त्यांची संतुलित भूमिका दिसून येते. कॉर्नरवरून, सेट प्लेमधून गोल करण्यावर जर्मनीने भर दिला आहे. विश्वचषकाच्या अंतिम लढतींचा इतिहास पाहिला तर या लढतींमध्ये गोलची संख्या मर्यादित राहते. आतापर्यंत वापरलेले सूत्रच राबवण्यावर जर्मनीचा भर असेल. मेस्सीला रोखण्यासाठी झोनल मार्किंग किंवा मॅन टू मॅनसारखे डावपेच जर्मनी अमलात आणू शकते. ब्राझीलविरुद्ध ब्लिट्झक्रिग हल्लाबोल यशस्वी ठरला होता. मात्र अर्जेटिना अव्वल संघ आहे. त्यामुळे बचावाची बाजू आणखी भक्कम करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. मेस्सीला थोपवत अर्जेटिनाचा वारू रोखण्यासाठी जर्मनी गुप्त योजनेची अंमलबजावणी करू शकते. दोन दर्जेदार संघांदरम्यानचा हा मुकाबला जगभरातल्या समस्त चाहत्यांना शानदार खेळाची मेजवानी असेल यात शंकाच नाही. जर्मनीचा संघ आणि मेस्सीची वैयक्तिक प्रतिभा यांच्यात कोण सरस ठरते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.