‘बार्सिलोनाचा दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सीने रिअल माद्रिदविरुद्धच्या लढतीत खेळण्याची जोखीम पत्करू नये. तसे केल्यास त्याला पुढील बराच काळ मैदानाबाहेर घालवावा लागेल,’ असे मत अर्जेटिना संघाचे डॉक्टर होमेरो डी अ‍ॅगोस्टिनो यांनी दिला. अ‍ॅगोस्टिनो यांच्या मतामुळे ‘ला लीगा’ फुटबॉल स्पध्रेतील क्लासिको येथे २१ नोव्हेंबर रोजी माद्रिदविरुद्धच्या लढतीत मेस्सी मुकणार असल्याची चिन्हे दिसू लागले आहेत. लास पालमॅसविरुद्धच्या सामन्यात पायाला दुखापत झाल्यामुळे मेस्सी २६ सप्टेंबरपासून सक्तीच्या विश्रांतीवर आहे. मात्र सोमवारी त्याने बार्सिलोना संघासोबत सरावात सहभाग घेतला. त्यामुळे २१ नोव्हेंबरला माद्रिदविरुद्ध होणाऱ्या लढतीपूर्वी तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी क्लबला अपेक्षा आहे. मात्र अर्जेटिनाचे डॉक्टर अ‍ॅगोस्टिनो यांनी हा मूर्खपणा असेल असे म्हटले आहे. ‘त्या लढतीत खेळल्यास मेस्सीची दुखापत आणखी बळावेल आणि त्याला अधिक काळ फुटबॉलपासून दूर राहावे लागेल. पुढील आठवडय़ात खेळण्यासाठी तो तंदुरुस्त नाही,’ असे मत त्यांनी व्यक्त केले.