अर्जेटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला विश्रांतीची गरज असून तो रिओ ऑलिम्पिकमध्ये खेळणार नाही, अशी माहिती फुटबॉल संघाचे प्रशिक्षक गेराडरे मार्टिनो यांनी अर्जेटिनाच्या आकाशवाणी केंद्राशी बोलताना दिली. मात्र, त्याच वेळी अमेरिकेत होऊ घातलेल्या शंभराव्या कोपा अमेरिका स्पध्रेत मेस्सी अर्जेटिना संघाचे नेतृत्व करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘‘मेस्सी ऑलिम्पिक स्पध्रेत खेळणार नाही. कोपा अमेरिका, ऑलिम्पिक आणि विश्वचषक पात्रता स्पर्धा या सलग होणाऱ्या स्पर्धामध्ये मेस्सीला खेळविण्याची जोखीम आम्ही उचलणार नाही,’’ असे मार्टिनो म्हणाले.
कोपा अमेरिका स्पध्रेला ३ जूनपासून सुरुवात होणार आहे, तर दोन महिन्यांनंतर ऑलिम्पिक (५ ऑगस्ट) स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. विश्वचषक पात्रता स्पर्धाही नोव्हेंबरमध्ये होणार असून बार्सिलोना क्लबचे वेळापत्रकही भरलेले आहे आणि त्यामुळे मेस्सीसाठी हे तणावाचे ठरू शकते. २००८मधील बीजिंग ऑलिम्पिकमध्ये मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेटिनाने सुवर्णपदक जिंकले होते.