गोल करण्याच्या अद्भुत क्षमतेसाठी जगविख्यात लिओनेल मेस्सी आता आपली मूळ भूमिका बदलण्याच्या विचारात आहे. भविष्यात आपण मध्यरक्षक म्हणून खेळण्याचा विचार करत आहोत, असे मेस्सीने सांगितले. मेस्सी मध्यरक्षक झाल्यास अर्जेटिना आणि बार्सिलोना क्लबला  रणनीतीत बदल करावा लागणार आहे.
‘‘जर संघाची गरज असेल, तर मी मधल्या फळीतही खेळेन. अनेक खेळाडू कारकीर्दीत स्थिरावल्यानंतर बचाव फळीत खेळण्यास प्राधान्य देतात. मात्र मी त्या खेळाडूंमधील नाही. मी कोणत्याही स्थानी खेळण्यास तयार आहे. अनेक खेळाडूंनी वेगवेगळ्या स्थानी खेळताना आपली कारकीर्द समृद्ध केली आहे,’’ असे मेस्सीने सांगितले.
पेप गार्डिओला यांच्या मार्गदर्शनाखाली बार्सिलोना संघाने अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत. पेप हे सध्या बायर्न म्युनिक संघाला मार्गदर्शन करीत आहेत. त्याबाबत मेस्सी म्हणाला, पेप यांच्याबाबत मला खूप आदर आहे. त्यांनी मला खूप वेळा मौलिक सूचना केल्या आहेत व वेळोवेळी चांगले मार्गदर्शन केले आहे. त्यांच्यामुळेच मी घडलो आहे. ’’