ब्राझीलच्या २३ गरीब चिमुकल्यांना बक्षिसाची रक्कम दान
जगज्जेत्या जर्मनी संघातील युवा खेळाडू मेसूत ओझिल याने विश्वचषक स्पर्धेतील विजयादरम्यान त्याला मिळालेल्या वैयक्तीक बक्षिसाची रक्कम २३ गरीब चिमुकल्यांच्या उपचारासाठी दान केली. विशेष म्हणजे, ओझिलने ही रक्कम जर्मनीतील नव्हे, तर ब्राझिलमधील गरीब मुलांना उपचारासाठी दान केली आहे.
ब्राझीलमध्ये झालेल्या फिफा विश्वचषकातील विजेत्या जर्मन संघातील प्रत्येक खेळाडूला उपांत्य फेरीतील विजय आणि अजिंक्यपद अशा दोन सामन्यांसाठी वैयक्तीक बक्षिस मिळाले आहे. या दोन्ही सामन्यांत ओझिलला मिळालेल्या बक्षिसाची अंदाजीत रक्कम २४ कोटींच्या घरात आहे. ही सर्व रक्कम ओझिलने २३ चिमुकल्यांच्या उपचारासाठी दान केली.
याआधी देखील ओझिलने ११ मुलांच्या उपचाराचा खर्च उचलला होता. यावर ओझिलने विश्वचषकातील विजय हा केवळ संघातील ११ खेळाडूंचा विजय नसतो, तर हा विजय संपूर्ण संघाचा असतो म्हणून हा आकडा वाढून आता २३ झाला असल्याचे मिश्किलपणे म्हणत, ओझिलने यंदा २३ चिमुकल्यांच्या उपचाराचा खर्च उचलला.