ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पध्रेचे दोन वेळा जेतेपद पटकावणाऱ्या व्हिक्टोरिया अझारेन्काने तिसऱ्यांदा डब्लूटीए मियामी खुल्या टेनिस स्पध्रेच्या जेतेपदावर नाव कोरले. अंतिम फेरीत तिने दोन ग्रॅण्ड स्लॅम नावावर असलेल्या स्वेतलाना कुझनेत्सोव्हावर ६-३, ६-२ असा सहज विजय मिळवला. यापूर्वी अझारेन्काने येथे २००९ आणि २०११मध्ये जेतेपदाला गवसणी घातली होती. तसेच या वर्षांतील तिचे हे ब्रिस्बेन आणि इंडियन वेल्सनंतरचे तिसरे अजिंक्यपद आहे.
या २६ वर्षीय बेलारुसच्या खेळाडूने आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. एकाच हंगामात मियामी आणि इंडियन वेल्स स्पध्रेत बाजी मारणाऱ्या तिसऱ्या खेळाडूचा मान तिने पटकावला. यापूर्वी स्टेफी ग्राफने १९९४ व १९९६मध्ये, तर किम क्लिजस्टेर्सने २००५मध्ये ही किमया केली होती. या विजयाबरोबर अझारेन्काने जागतिक क्रमवारीत आठव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर झेप घेतली. ‘‘मियामी स्पध्रेने मला अनेक संस्मरणीय आठवणी दिल्या आहेत. त्यामुळे येथे खेळण्याचा आनंद निराळाच आहे,’’ असे ती म्हणाली.