आयपीएलमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नसली तरी इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत तो फॉर्मात येईल, असा विश्वास ऑस्ट्रेलिया  संघाचा माजी फलंदाज माइक हसीने व्यक्त केला आहे.

‘‘कोहली हा एक दर्जेदार खेळाडू आहे. त्याला आयपीएलमध्ये सूर गवसला नव्हता. पण चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत त्याला कमी लेखण्याची चूक कोणीही करू नये. या स्पर्धेत कोहली पुन्हा त्याच्या लयीत दिसेल आणि जगाला आपला दर्जा दाखवून देईल,’’ असा विश्वास हसीने व्यक्त केला आहे.

आयपीएलच्या कामगिरीचा कोहलीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे हसीला वाटते. याबाबत तो म्हणाला की, ‘‘आयपीएलच्या वाईट कामगिरीचा कोहलीवर विपरीत परिणाम होणार नाही. कारण आयपीएल आणि चॅम्पियन्स करंडक या दोन्ही स्पर्धा भिन्न आहेत. त्याचबरोबर संघ, देश मैदाने आणि वातावरणही सारखे नसेल. जर या स्पर्धेत कोहलीकडून चांगली सुरुवात झाली तर त्याला रोखणे सोपे नसेल. फलंदाजीच्या दृष्टिकानोतून विचार केला तर चेंडू खेळण्यासाठी थांबायला हवे. चेंडू जेवढा उशिरा खेळता येईल, तेवढा वेळ देऊन खेळायला हवा.’’

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कोहलीसाठी उत्तम संधी -पनेसार

लंडन : भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या धावा आयपीएलमध्ये आटल्याचे दिसून आले असले तरी इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत धावांची भूक भरून काढेल. पाकिस्तानविरुद्धचा सामना हा कोहलीला फॉर्मात येण्यासाठी उत्तम व्यासपीठ असेल, असे मत इंग्लंडचा फिरकीपटू माँटी पनेसारने व्यक्त केले आहे. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेची १ जूनला सुरुवात होणार असून ४ जूनला भारताचा पाकिस्तानशी सामना होणार आहे.

पनेसार पुढे म्हणाला की, ‘भारताला ही स्पर्धा जिंकण्याची चांगली संधी आहे. कारण कोहली हा भारताचा कर्णधार आहे आणि मोठय़ा स्पर्धामध्ये नेहमीच तो चांगला खेळ करत असतो. त्याने जर चांगली कामगिरी केली तर भारताला ही स्पर्धा जिंकणे जास्त अवघड नसेल.’’

या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्याविरुद्ध सरान सामने खेळणार आहे. कोहलीसाठी ही पहिलीच मोठी स्पर्धा असणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत कोहली स्वत:ला झोकून देईल, असे पनेसारला वाटते.

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्याविषयी पनेसार म्हणाला की, ‘‘भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना नेहमीच रंगतदार होतो. या सामन्याने स्पर्धेला अधिक रंग चढेल. या सामन्याचे वातावरण उत्साहपूर्ण असेल. इंग्लंडच्या चाहत्यांना या दोन्ही देशांतील सामना पाहायला नेहमीच आवडतो. कारण इंग्लंडमध्ये बरेच आशिया खंडातील नागरिक आहेत. ते इंग्लंडला तर पाठिंबा देतातच, पण आशिया खंडातील भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका यांनाही प्रोत्सहन देत असतात.’’

अनिल कुंबळेला मदतवाढ द्यायला हवी

‘‘अनिल कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. गेल्या वर्षभरात भारताकडून सर्वोत्तम कामगिरी पाहायला मिळाली. पण असे असतानाही बीसीसीआय नवे प्रशिक्षक आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. बीसीसीआय नेमका काय विचार करते, ते अनाकलनीय आहे. कुंबळेसारख्या प्रशिक्षकाला अजून दोन वर्षे तरी मुदतवाढ द्यायला हवी. वर्षभर चांगली कामगिरी केल्यावर कुंबळेला मुदतवाढ मिळायला हवी,’’ असे पनेसार म्हणाला.

युवराज-धोनी हे प्रेरणादायी ठरतील

‘‘जास्त काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणे सोपे नसते आणि तुम्ही जेव्हा जास्त क्रिकेट खेळता, तेव्हा तुमच्या गाठीशी चांगला अनुभव आलेला असतो. भारतीय संघातील युवराज सिंग व महेंद्रसिंग धोनीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. कर्करोगाशी झगडून युवराजने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन केले आहे, त्यासाठी स्थानिक सामन्यांमध्ये त्याने दमदार कामगिरी केली आहे. विजयावर शिक्कामोर्तब करण्याची क्षमता धोनीकडे अजूनही आहे. त्यामुळे हे दोधेही संघासाठी प्रेरणादायी ठरतील,’’ असे पनेसारने सांगितले.