ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये १८ विजेतेपद मिळविणाऱ्या मायकेल फेल्प्सला मद्यसेवन करीत मोटार चालविण्याचा प्रयोग अंगाशी आला आहे. अमेरिकन जलतरण महासंघाने त्याच्यावर सहा महिन्यांसाठी बंदी घातली आहे. त्यामुळे त्याला विश्वचषक स्पर्धेला मुकावे लागणार आहे. बाल्टिमोर येथे दारूच्या नशेत तो मोटार चालवीत असताना पोलिसांनी त्याची गाडी अडविली. त्याने अतिरिक्त मद्य घेतले असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. त्यामुळे अमेरिकन जलतरण महासंघानेही त्याच्यावर बंदी घातली आहे. महासंघाचे कार्यकारी संचालक चुक विगेलुस यांनी सांगितले, ‘‘फेल्प्स याने आपली चूक कबूल केली आहे आणि कारवाईचाही स्वीकार केला आहे. झालेली चूक सुधारण्यासाठी त्याने काही महिने स्पर्धात्मक जलतरणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही त्याला सुधारणा करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रमही दिला आहे.’’ या कारवाईमुळे रशियात पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक स्पर्धेत तो अमेरिकेचे प्रतिनिधित्व करू शकणार नाही. रिओ येथे २०१६मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी ही जागतिक स्पर्धा अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. या स्पर्धेवर फेल्प्सला पाणी सोडावे लागणार आहे. २९ वर्षीय फेल्प्सने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये २२ पदकांची कमाई केली आहे. लंडन २०१२च्या ऑलिम्पिकनंतर त्याने निवृत्ती जाहीर केली होती. मात्र पुन्हा त्याने स्पर्धात्मक जलतरणात भाग घेण्याचा निर्णय घेतला होता.