लोढा समितीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) बँक खाती गोठविण्याचे आदेश दिल्यानंतर बीसीसीआयने सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेली मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नियोजित वेळापत्रकानुसार न्यूझीलंडचा संघ भारताविरुद्ध आणखी एक कसोटी आणि पाच एकदिवसीय सामने खेळणार होता. मात्र, बीसीसीआयने आता हे सामने रद्द करण्याचे संकेत दिले आहेत.
लोढा समितीच्या शिफारशींमुळे आमचे हात बांधले गेले आहेत. बँकांनी आमची खाती गोठविल्याने आमच्याकडे भारत- न्यूझीलंड मालिका रद्द करण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. आम्हाला जगासमोर भारताची नाचक्की करायची नाही. बँक खाती गोठवली जाणे, हा काही विनोद नाही. पैसेच नसतील तर आम्ही काम कसे करायचे?, सामन्यांचे आयोजन कसे करायचे?, त्यासाठीचे पैसे कसे द्यायचे? एक आंतराष्ट्रीय संघ भारतात खेळत असल्यामुळे बऱ्याच गोष्टींचे भवितव्य टांगणीला लागले आहे, असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.
लोढा समितीने बीसीसीआयची खाती असलेल्या बँकांना पत्र पाठवून खाती गोठविण्याची विनंती केली होती. ३० सप्टेंबर रोजी झालेल्या बीसीसीआयच्या विशेष सर्वसाधारण बैठकीत नव्या समितीने सदस्य क्रिकेट संघटनांना मोठ्याप्रमाणावर निधी दिल्याचे निदर्शनास आल्यानंतर लोधा समितीने बँकांना यासंदर्भातील आदेश दिले होते. गेल्या काही दिवसांत लोढा समितीच्या शिफारशींवरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यात तीव्र संघर्ष होताना दिसत आहे. लोढा समितीच्या प्रमुख शिफारशींची अंमलबजावणी करणे शक्य नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. देशातील क्रिकेट प्रशासन पारदर्शक होण्याच्या उद्देशाने सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त लोढा समितीने बहुकलमी शिफारशी सादर केल्या होत्या. बीसीसीआयने शिफारशींच्या अंमलबजावणीत चालढकल केल्याने सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला इशारा दिला होता.