कोणत्याही सामन्यात दडपणाबरोबर आशा-अपेक्षांचे ओझे असते.. मग विश्वचषक मायदेशातच असला आणि ‘करो, या मरो’सारखा सामना असल्यावर या साऱ्या गोष्टी बऱ्याच पटीने वाढतात.. या साऱ्या ओझ्याखाली भारताने श्रीलंकेविरुद्धचा सामना गमावल्यावर कर्णधार मिताली राजचे डोळे पाणावले आणि तिला आपला हताशपणा लपवताही आला नाही. मितालीच्या याच भावस्पर्शी डोळ्यांतून भारताच्या पराभवाची ‘अधुरी एक कहाणी’ सहजपणे उलगडत होती. डबडबलेल्या डोळ्यांनी पत्रकारांना सामोरी जात असताना मिताली भांबावली नाही, भावुक झाल्याचे तिने दाखवले नाही. परंतु भारतभूमीवर रंगलेल्या विश्वचषकात देशवासीयांसाठी आपण काहीही करू शकलो नाही, हे शल्य तिला नक्कीच बोचत होते. पराभवाने निराशेच्या गर्तेत अडकलेल्या मितालीला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सातव्या क्रमांकासाठीच्या सामन्यातही रस नसल्याचे यावेळी जाणवले. ‘‘पराभवाने नक्कीच निराश झाली आहे, या पराभवाने आमचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्याला जास्त महत्त्व नसेल’’, असे मितालीने सांगितले.
पराभवाची कारणमीमांसा मांडताना मिताली म्हणाली, श्रीलंका २८२ धावा उभारेल, असे आम्हाला वाटलेच नव्हते. कारण आमची गोलंदाजी गेल्या दोन सामन्यांमध्ये चांगली होती. झुलानवर आम्ही निर्भर होतोच, पण झुलानबरोबरच एकाही गोलंदाजाची कामगिरी चांगली झाली नाही. २८२ धावांचे आव्हान समोर असताना आम्ही जिंकण्यासाठीच प्रयत्न केले, पण विकेट्स झटपट गमावल्यावर आम्ही २५१ धावा करून ‘सुपर-सिक्स’मध्ये  पात्र ठरण्याची रणनीती आखली, पण त्यामध्येही आम्ही अपयशी ठरलो. एवढे मोठे आव्हान पार करण्यासाठी चांगल्या सुरुवातीची गरज असते, पण आमची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या ५० धावांमध्येच आम्ही महत्त्वाचे फलंदाज गमावले आणि तिथेच आम्हाला धक्का बसला.
अवसान पूणपणे गळाल्यावरही मिताली पत्रकारांच्या प्रश्नांना एका व्यावसायिक खेळाडूसारखीच उत्तरे देत होती. पण तिची देहबोली मात्र, आपण कुचकामी ठरलो, देशवासीयांचा अपेक्षाभंग केला हे सांगणारी होती. ‘‘आम्ही पराभूत झालो असलो तरी बऱ्याच सकारात्मक गोष्टी पुढे आल्या आहेक. पूनम राऊत, थिरूश कामिनी, करुणा जैन, हरमनप्रीत कौर यांच्यासारखे चांगले फलंदाज भारताला मिळाले आहेत. त्यामुळे भारतीय संघाचे भवितव्य उज्ज्वल आहे’’, हे सांगायलाही मिताली यावेळी विसरली नाही.