भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजला विश्वास

भारतीय महिला क्रिकेट संघाला विश्वचषक विजेतेपदाने दुसऱ्यांदा हुलकावणी दिली असली तरी कर्णधार मिताली राजने देशातील महिला क्रिकेटपटूंचे भविष्य उज्ज्वल आहे. पुढील पिढीसाठी आम्ही पायाभरणी केली आहे, असे प्रतिपादन तिने केले.

विश्वचषक जेतेपदाच्या उंबरठय़ावर पोहोचलेल्या भारतीय संघाला अंतिम लढतीत इंग्लंडकडून  ९ धावांनी पराभव पत्करावा लागला. २२९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारत ३ बाद १९१ अशा सुस्थितीत होता, परंतु तळाच्या फलंदाजांच्या हाराकिरीमुळे संपूर्ण संघ ४८.४ षटकांत २१९ धावांवर गडगडला. सामन्यानंतर महिला क्रिकेटविषयी मिताली म्हणाली, ‘‘या संघाने भारतातील पुढील पिढीसाठी व्यासपीठ निर्माण केले आहे. महिला क्रिकेटसाठी त्यांनी कवाडे उघडली आणि त्याचा त्यांना अभिमान वाटायलाच हवा. या खेळाडूंनी घडवलेला बदल मला दिसतोय.’’

अंतिम लढतीत भारतीय खेळाडूंना दबावाखाली चांगली कामगिरी करण्यात अपयश आल्याची कबुली ३४ वर्षीय मितालीने दिली, परंतु संपूर्ण स्पध्रेत भारतीय खेळाडूंनी दाखवलेल्या लढाऊ वृत्तीचे तिने कौतुक केले. ती म्हणाली, ‘‘प्रत्येक जण चिंताग्रस्त होत्या आणि हेच पराभवाचे कारण असू शकते. शेवटी अनुभव आणि कठीण प्रसंगी परिस्थिती कशी हाताळतो, यावर सर्व अवलंबून असते. आमच्या खेळाडू तितक्या अनुभवी नव्हत्या, परंतु संपूर्ण स्पध्रेत त्यांनी ज्या पद्धतीने लढाऊ वृत्ती दाखवली त्याने सर्वाची मने जिंकली.’’

भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी क्रिकेटपटूंसह इतर खेळाडूंनीही महिला क्रिकेटपटूंचे कौतुक केले. त्याविषयी मिताली म्हणाली, ‘‘लोकांकडून मिळणारा प्रतिसाद सकारात्मक होता. बीसीसीआयलाही आमचा अभिमान वाटत असेल याची मला खात्री आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर आम्ही अंतिम फेरीत पोहोचू असे कुणालाही वाटले नव्हते, तरीही संघाने अंतिम फेरीत धडक मारली आणि यजमान संघाला कडवी झुंज दिली.’’

ऑस्ट्रेलियातील महिलांची बिग बॅश ट्वेन्टी-२० लीग किंवा महिलांच्या आयपीएल क्रिकेट स्पध्रेतून खेळाडूंना कठीण परिस्थिती हाताळण्याचा अनुभव मिळेल, असे मितालीला वाटते. ती म्हणाली, ‘‘स्मृती मंधाना आणि हरमनप्रीत कौर या भारतीय खेळाडूंना बिग बॅश लीगने संधी दिली. आणखी काही खेळाडूंना लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाल्यास त्यांच्या पदरी अनुभवही येईल आणि त्यांच्या खेळात सुधारणा होण्यासही मदत मिळेल. जर तुम्ही मला विचाराल तर महिलांची आयपीएल स्पर्धा खेळवण्याची हीच योग्य वेळ आहे.’’

जागतिक महिला संघाचे नेतृत्व मितालीकडे

भारताची कर्णधार मिताली राजची आयसीसी महिला जागतिक क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने निवड केलेल्या या संघात भारताच्या हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांचाही समावेश करण्यात आला आहे.

३४ वर्षीय मितालीने भारताचे नेतृत्व करताना संघाला उपविजेतेपद मिळवून दिले. तिने या स्पर्धेत दोन शतकांसह ४०९ धावा केल्या. विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलणारी अ‍ॅन्या श्रबसोलबरोबरच टॅमी ब्यूमोंट, यष्टिरक्षक सारा टेलर, अ‍ॅलेक्स हार्टले या इंग्लंडच्या चार खेळाडूंना जागतिक संघात स्थान देण्यात आले आहे. मिताली व टेलर यांची २००९च्या विश्वचषक स्पर्धेच्या वेळीही जागतिक संघात निवड झाली होती. श्रबसोलला २०१३च्या विश्वचषक स्पर्धेच्या वेळी जागतिक संघात स्थान मिळाले होते.

आयसीसीचा जागतिक संघ : मिताली राज (कर्णधार), टॅमी ब्यूमोंट, लॉरा वुल्वडर्ट, इलिसे पेरी, सारा टेलर (यष्टिरक्षक), हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, मेरिझानी कॅप, डेन व्हान निएकेर्क, अ‍ॅन्या श्रबसोल, अ‍ॅलेक्स हार्टले, बारावी खेळाडू : नताली शिवर.

आम्ही यापेक्षा चांगली कामगिरी करू शकतो – गोस्वामी

आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत निसटता पराभव झाल्यामुळे आम्हाला खंत वाटली आहे. मात्र सांघिक कामगिरीच्या जोरावर यापेक्षा जास्त चांगली कामगिरी करू शकतो, असे भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने सांगितले.

इंग्लंडला विश्वचषक स्पर्धेत पराभूत करणारा भारत हा एकमेव संघ होता. साखळी गटात भारताने त्यांच्यावर मात केली होती. मात्र अंतिम लढतीत त्यांच्यावर मात करण्यात भारताला अपयश आले. या बाबत गोस्वामी म्हणाली, ‘‘या स्पर्धेतील अंतिम फेरीत स्थान मिळवू अशी आम्ही कधीच अपेक्षा केली नव्हती. प्रत्येक सामन्यानंतर आमचा आत्मविश्वास उंचावत गेला. संघाने अंतिम फेरीत स्थान मिळवले, त्यामध्ये संघातील प्रत्येक खेळाडूचा समान वाटा होता. संघ म्हणून आमची कामगिरी समाधानकारकच झाली. तीन आठवडय़ांच्या या स्पर्धेत आम्ही खेळाच्या निखळ आनंदासाठीच खेळलो. दुर्दैवाने विजेतेपदाच्या संधीचे आम्ही सोने करू शकलो नाही. अर्थात खेळामध्ये हार व जीत हे दोन्ही घटक असतात.’’

अंतिम फेरीतील कामगिरीबाबत ती म्हणाली, ‘‘खेळपट्टीपासून गोलंदाजांना फारसे साहाय्य मिळत नव्हते. त्यामुळेच आम्हाला पहिला बळी मिळवताना खूप वेळ लागला. आम्ही अचूक टप्पा व दिशा ठेवत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. नशिबाने आम्हाला अपेक्षेइतकी साथ मिळाली नाही.’’

५० महिला विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत उपविजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय महिला संघाला मध्य प्रदेश सरकारने ५० लाख रुपयांचे बक्षीस घोषित केले आहे. शानदार कार्यक्रमात भारतीय संघाला समारंभपूर्वक हे पारितोषिक देण्यात येईल, असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितले.

जल्लोष अन् शांतता

भारतीय महिला क्रिकेट संघाला विश्वचषक उंचावताना पाहण्यासाठी देशभरात जल्लोषाचे वातावरण होते. संघातील खेळाडूंच्या घरी जणू सण साजरा करण्याची लगबग सुरू होती, परंतु भारताच्या पराभवाने जल्लोषमय वातावरण अचानक शांततेत बदलले.

भारताची अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामीची बहीण झुम्पाने सांगितले की, ‘‘निकालानंतर आम्ही स्तब्ध झालो. आई आणि बाबा अजूनही गप्प आहेत. झुलनलाही आम्ही संपर्क केलेला नाही. चकदाहमध्ये आम्ही आनंद साजरा करण्याची तयारी केली होती. जवळपास ८०० लोक येथील रामकृष्ण मंदिराशेजारी एकत्र जमलो होतो आणि मोठय़ा पडद्यावर सर्व जण सामना पाहत होतो.’’

हरमनप्रीत कौरच्या घरीही असेच वातावरण होते. तिचे वडील हरमंदर सिंग म्हणाले, ‘‘महिला संघाचा सर्वाना अभिमान आहे. त्यांनी महिला क्रिकेटला संजीवनी दिली. उपविजेतेपदानेही देशातील महिला क्रिकेटपटूंना प्रेरणा मिळाली आहे.’’

बीसीसीआयतर्फे संघाचा भव्य सत्कार होणार

विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात उपविजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय महिला संघातील खेळाडूंचा भव्य सत्कार करण्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ठरवले आहे.

कौतुकाचा वर्षांव

भारतीय महिला संघाला लंडन येथे रविवारी झालेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील विजेतेपदाची संधी साधता आली नाही. मात्र त्यांनी अंतिम फेरीत स्थान मिळवताना केलेल्या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, विक्रमवीर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षांव केला आहे.  ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिक, भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विन, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर, सिनेअभिनेता अक्षय कुमार यांनीही भारतीय महिला संघाचे कौतुक केले आहे.

आमच्या महिला क्रिकेटपटूंनी सर्वोत्तम कौशल्य दाखवले. या स्पर्धेतील अंतिम फेरीत स्थान मिळवताना त्यांनी घेतलेली मेहनत, जिद्द खरोखरीच कौतुकास्पद आहे. त्यांना विजेतेपद मिळविता आले नसले तरी त्यांनी देशातील सर्वानाच अभिमान वाटावी असे यश मिळवले आहे.  नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान

आमच्या महिला संघाने विश्वचषक जिंकला नसला तरी त्यांनी भारतीयांची मने निश्चितपणे जिंकली आहेत. सर्वाना अभिमानास्पद अशी ही तुमची कामगिरी आहे.  व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, माजी फलंदाज

भारतीय संघाने मिताली राजच्या नेतृत्वाखाली उपांत्य फेरीत सहा वेळा विश्वविजेतेपद मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियावर मात केली होती. त्यांचा हा विजय विजेतेपदापेक्षाही मोठा आहे. आम्हा सर्वाना तुमचा खूप अभिमान वाटतो.  रवी शास्त्री, भारताचे मुख्य प्रशिक्षक

काही वेळा विजेतेपद आपल्या नशिबातच नसते. मात्र तुम्ही घेतलेली ही उत्तुंग झेप नवोदित खेळाडूंना प्रेरणादायकच आहे. तुमच्या या कामगिरीमुळे महिला क्रिकेटला सोन्याचे दिवस प्राप्त होणार आहेत.   सचिन तेंडुलकर, भारताचा महान क्रिकेटपटू

क्रिकेटमध्येही भारतीय महिला राज्य करू शकतात हे तुम्ही दाखवून दिले आहे. अंतिम फेरीत पराभूत झाला असला तरी तुम्ही या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड यांच्यासारख्या बलाढय़ संघांना पराभवाचा दणका दिला आहे. ही कामगिरी विजेतेपदासारखीच आहे.  एम. सी. मेरी कोम, माजी बॉक्सिंगपटू

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय पुरुष संघाबरोबरच महिला संघानेही आपला दबदबा निर्माण केला आहे. महिलांमध्येही क्रिकेटचे अव्वल यश मिळवण्याची क्षमता आहे, हे त्यांनी दाखवून दिले आहे. बिशनसिंग बेदी, माजी क्रिकेटपटू

तुम्ही आम्हाला विश्वविजेतेपदाचे स्वप्न दाखवले आहे. हे स्वप्न साकार करता आले नसले तरी तुमचे यश आम्हालादेखील अभिमानास्पद आहे. तुमच्याकडेही जगावर राज्य करण्याची क्षमता आहे, हे तुम्ही सिद्ध केले आहे. गौतम गंभीर,भारताचा माजी सलामीवीर

तुमची कामगिरी अलौकिक आहे. विजेतेपदाची संधी पुन्हा मिळू शकेल. त्या वेळी तुम्ही विजेतेपद मिळवाल अशी मला खात्री आहे. तुम्हास भावी कारकीर्दीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा.  गगन नारंग, आंतरराष्ट्रीय नेमबाज