भारतीय कसोटी संघाचा कर्णधार आणि सध्याचा आघाडीचा क्रिकेटपटू विराट कोहली त्याच्या आक्रमक स्वभावामुळे कायमच चर्चेत असतो. कोहलीच्या आक्रमक स्वभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन प्रशिक्षक नेमायला हवा, असा सल्ला काही दिवसांपूर्वीच माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी दिला होता. त्यानंतर आता आणखी एक माजी कर्णधार मोहमद अझरुद्दीन यांनीही, विराट कोहलीने त्याच्या आक्रमक स्वभावावर नियंत्रण न मिळवल्यास त्याची संपूर्ण कारकीर्द वाया जाऊ शकते, असा सल्ला दिला आहे.
आयपीएलच्या आठव्या मोसमाच्या अंतिम सामन्यामध्ये एका मुलाखतीत त्यांनी विरोट कोहलीच्या खेळीचे कौतुक केले. ते म्हणाले, विराट कोहली हा गिफ्टेड क्रिकेटपटू आहे. संपूर्ण जगाने त्याला उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणूनच ओळखावे, असे मला वाटते. मात्र, त्याने आपला आक्रमक स्वभावावर नियंत्रण ठेवले नाही, तर त्याची संपूर्ण कारकीर्द वाया जाऊ शकते.
काही दिवसांपूर्वी विराट कोहलीच्या स्वभावाबाबत बिशनसिंग बेदी म्हणाले होते की, माझ्या मते विराटला चांगल्या प्रशिक्षकाची गरज आहे, जो त्याला चांगले मार्गदर्शन करू शकेल. जो कुणी भारतीय संघाचा प्रशिक्षक होईल, त्याला कोहलीच्या आक्रमक स्वभावावर नियंत्रण ठेवता यायला हवे. कोहली हे आवेगशील व्यक्तिमत्त्व आहे आणि त्यामध्ये त्याने बदल करण्याची गरज आहे. क्रिकेट हा काही कबड्डी किंवा खो-खोसारखा खेळ नाही. कारकीर्द जर दीर्घ व्हावी असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला तुमच्या आक्रमक स्वभावामध्ये बदल करायलाच हवा.