मोहिते रेसिंग अकादमीची किमया

शाहू महाराजांचे कोल्हापूर म्हटले की, कुस्तीचे आखाडे आणि फुटबॉल क्लबमधले द्वंद्व प्रसिद्ध आहे. मात्र आता गाडय़ांच्या शर्यतींच्या क्षेत्रातील कार्टिगमध्येही कोल्हापूरने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे. कोल्हापूरच्या मोहिते रेसिंग अकादमीने ही किमया घडवली आहे.

उद्योगपती आणि स्वत: मोटोक्रॉस शर्यतपटू असणाऱ्या शिवाजी मोहिते यांचा मुलगा ध्रुवनेही कार्टिगमध्ये रुची दाखवली. शहरात आणि परिसरात कार्टिगची सुविधा नसल्याने शिवाजी यांनी मुलासाठी चक्क दीड किलोमीटर अंतराचा कार्टिग ट्रॅकचा घाट घातला. शर्यतपटू आणि पुतण्या अभिषेक मोहिते यांच्याकडे त्यांनी निर्मितीची जबाबदारी सोपवली. अकादमीचे व्यवस्थापन पाहणारे अभिषेक याविषयी म्हणाले, ‘‘राज्यात व्यावसायिक स्वरूपाचा कार्टिग ट्रॅक नव्हता. त्यामुळे कोइंबतूरच्या ट्रॅकचा अभ्यास केला. इंडोनेशिया, मलेशिया अशा विविध देशांमध्ये जाऊन ट्रॅकची पाहणी केली. फ्रान्सस्थित आंतरराष्ट्रीय कार्टिग संघटनेचे ट्रॅक उभारणीसाठीची मानके प्रमाण मानली आणि वर्षभरात ट्रॅक बांधून तयार झाला.’’

मोहिते यांनी केवळ ध्रुवसाठी ट्रॅकचा उपयोग मर्यादित न ठेवता मोहिते रेसिंग अकादमीची स्थापना केली. कोल्हापूरला मोटारस्पोर्ट्सची परंपरा आहे. गाडय़ांची, वेगाची आवड असणाऱ्या आणि आर्थिकदृष्टय़ा सधन मंडळींकरिता आपली आवड जोपासण्यासाठी व्यासपीठ मिळाले. अकादमीत प्राथमिक, मध्यम आणि प्रगत स्वरूपाचे प्रशिक्षण मिळते.

‘‘मुंबई-पुण्यातील मोटारस्पोर्ट्सची आवड असणारी मंडळी अकादमीत येतात. देशभरात होणाऱ्या शर्यतींमध्ये अकादमीचे विद्यार्थी अव्वल तीनमध्ये सातत्याने स्थान पटकावत आहेत. माझ्यासह आठ ते दहा मंडळी अकादमीचे काम सांभाळतात. मात्र नफा कमावण्यासाठी हा पसारा मांडलेला नाही. आर्थिक नुकसानही होते, मात्र मोटारस्पोर्ट्सच्या आवडीसाठी आम्ही हे करतो,’’ असे त्यांनी पुढे सांगितले. जेके टायर कार्टिग अजिंक्यपद स्पर्धेची चौथी फेरी या ट्रॅकवर रंगली होती. चाहत्यांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे अंतिम फेरी याच ट्रॅकवर आयोजित करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला.

‘‘आमच्या माध्यमातून मोटारस्पोर्ट्स खेळासाठी कोल्हापूरात व्यासपीठ निर्माण झाले, याचे समाधान आहे. वेगाची आवड असणाऱ्या तरुणांनी रस्त्यावर आक्रस्ताळ्या पद्धतीने गाडी चालवण्यापेक्षा ट्रॅकवर ऊर्जा केंद्रित करून कर्तृत्व सिद्ध करावे. शर्यतपटूंची सुरक्षा आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. म्हणूनच दहा वर्षांच्या कालावधीत एकही मोठा अपघात झालेला नाही. मोटारस्पोर्ट्स खर्चीक खेळ आहे. शर्यतीसाठी आयात कराव्या लागणाऱ्या वस्तूंवरचा कर सरकारने रद्द केला तरी मोठी मदत होईल,’’ असे शिवाजीराव मोहिते यांनी सांगितले.

याविषयी ध्रुव मोहिते म्हणाला, ‘‘गाडय़ांची आवड आमच्या कुटुंबात आजोबांपासून आहे. तिसऱ्या वर्षीच मी बाइक शिकलो. काही वर्षांत चारचाकीही चालवू लागलो. कौशल्य पाहून घरच्यांनी मला कार्टिगमध्ये जाण्यास प्रोत्साहन दिले. मात्र कोल्हापुरात तशी सुविधा नव्हती. घरच्यांनी ट्रॅक उभा करण्याचे शिवधनुष्य पेलल्याने सरावासाठी हक्काचा ट्रॅक मिळाला. या ट्रॅकच्या निमित्ताने कोल्हापुरातल्या शर्यतपटूंचा संघ निर्माण झाला. त्यांना सरावासाठी दुसऱ्या शहरात जावे लागत नाही. कार्टिग तसेच रेसिंग म्हणजे फक्त वेग नाही. गाडीच्या तांत्रिक तपशिलांची माहिती, शारीरिक तंदुरुस्ती व नियम असे अनेक मुद्दे असतात. अकादमीच्या निमित्ताने शास्त्रोक्त प्रशिक्षणाची संधी शर्यतपटूंना मिळते आहे.’’