मँचेस्टर युनायटेड संघाला प्रशिक्षक लुइस व्हॅन गाल यांच्याकडून मोठय़ा अपेक्षा होत्या. पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना चॅम्पियन्स लीगमध्ये स्थान मिळवता आले नाही. त्यामुळे त्यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर जोस मॉरिन्हो यांच्याकडे संघाचे प्रशिक्षकपद सोपवण्यात आले असून संघाच्या स्वप्नपूर्तीसाठी ते सज्ज झाले आहेत.

सोमवारी झालेल्या एफए चषकाची अंतिम फेरी युनायटेडने जिंकली आणि त्यानंतर ४८ तासांमध्ये गाल यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली. अमेरिकेत स्थायिक असलेल्या युनायटेडच्या मालकाला आपला संघ चॅम्पियन्स लीगमध्ये खेळू शकत नसल्याचे समजले आणि त्यानंतर त्यांनी गाल यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेतला. मॉरिन्हो यांची चेल्सी या संघाने यापूर्वी हकालपट्टी केली होती. संघातील अव्वल खेळाडूंबरोबर असभ्य वर्तणूक केल्याबद्दल त्यांना संघातून काढण्यात आले होते. मॉरिन्हो यांच्यावर आता युनायटेडचे गतवैभव मिळवून देण्याची जबाबदारी असेल.