भारत सरकारची मान्यता लाभलेल्या भारतीय शरीरसौष्ठवपटू महासंघाने सहाव्या ‘मिस्टर वर्ल्ड’ शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन मुंबईत केले आहे. ही स्पर्धा ७ ते ९ डिसेंबर या कालावधीमध्ये रंगणार असून यामध्ये जवळपास १६ देशांचे ४०० शरीरसौष्ठवपटू सहभागी होणार आहेत.
‘‘ही स्पर्धा म्हणजे एक जागतिक सण आहे. जवळपास ६० देशांमधील शरीरसौष्ठवपटू या स्पर्धेसाठी येणार असून सर्वाचे डोळे भारताकडे लागलेले आहेत. या स्पर्धेने भारतामध्ये शरीरसौष्ठव खेळात नक्कीच मोठी क्रांती होईल. भारतातील लोकांना परदेशातील व्यायसायिक शरीरसौष्ठवपटूंना बघण्याची ही सुवर्ण संधी असेल, ’’असे आयोजन समितीचे अध्यक्ष मधुकर तळवळकर यांनी सांगितले.
या स्पर्धेत एकूण ३५ वेगवेगळे गट तयार करण्यात येणार आहेत. पुरुषांसाठी खुल्या गटाबरोबर कनिष्ठ स्पर्धा (२१ वर्षांखालील) आणि मास्टर्स स्पर्धा (४० ते ६९ वर्षे) खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धेत भारताकडून २९ संलग्न राज्य आणि सरकारी संस्थांबरोबरच रेल्वे, नौदल, सेवा दल यांचेही संघ सहभागी होणार आहेत.
‘‘या खेळामुळे भारतातील शरीरसौष्ठव या खेळासहित शरीरसौष्ठवपटूंना नक्कीच चांगले दिवस येतील. या स्पर्धेमुळे भारतीयांना जागतिक दर्जाचे शरीरसौष्ठवपटू पाहायला मिळतील आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेता येईल. त्यामुळे या स्पर्धेमुळे भारतामध्ये शरीरसौष्ठव खेळ अधिकाधिक बहरेल,’’ असे भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे सरचिटणीस चेतन पाठारे यांनी सांगितले.

पाकिस्तानचे २४ शरीरसौष्ठवपटू
या स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या २४ खेळाडूंनी स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज पाठवले आहेत. पण जोपर्यंत त्यांना व्हिसा मिळत नाही, तोपर्यंत त्यांचा प्रवेश निश्चित करण्यात येणार नाही.

शंभरहून अधिक महिला खेळाडू
पुरुषांबरोबर महिलांमध्येही शरीरसौष्ठव खेळाला चांगलीच मागणी आहे. या स्पर्धेत शंभरहून अधिक महिला शरीरसौष्ठव खेळाडू सहभागी होणार आहे. या स्पर्धेत भारताकडून आतापर्यंत करुणा वाघमारे, रबिता देवी, ममता देवी, सरिता देवी, वटिका ग्रोव्हर, पूजा रॉय या महिला शरीरसौष्ठव खेळाडूंची नावे पुढे आली आहेत.