दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावून संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या विराट कोहलीचे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कौतुक केले आहे. संघाला जेव्हा गरज होती, तेव्हा कोहलीने शतक झळकावले आणि भारतासाठी विजयाचा पाया रचला, असे धोनीने सांगितले.

‘‘विराट नेहमीच खेळ कसा सुधारता येईल, याकडे लक्ष देत असतो. गेल्या काही सामन्यांमध्ये तो ६०-७० धावा करीत होता, पण त्याला शतक पूर्ण करता येत नव्हते. त्यानंतर त्याने खेळामध्ये सुधारणा केली. त्याने ज्या प्रकारे ५०-६० आणि
१००-१०० हा पल्ला गाठला, त्याबद्दल त्याचे कौतुक करायला हवे. कारण हा पल्ला गाठताना बरेच फलंदाज बाद होतात. एकदा शतक झळकावल्यावर तो मोठी खेळी साकारण्याच्या दृष्टीनेच विचार करीत असतो,’’ असे धोनी म्हणाला.

चौथ्या लढतीमधील विजयानंतर धोनीने गोलंदाजांचे आणि खासकरून फिरकीपटू हरभजन सिंगचे कौतुक केले आहे. तो म्हणाला, की, ‘‘मालिकेच्या सुरुवातीलाच फिरकीपटू आर. अश्विन दुखापतग्रस्त झाला आणि आम्हाला मोठा फटका बसला. कारण तो आमच्या मुख्य गोलंदाज होता. कोणत्याही क्षणी भेदक मारा करण्यात त्याची हुकूमत होती, पण हरभजन सिंगने त्याची जागी घेतली आणि आपल्या अनुभवाच्या जोरावर चांगली कामगिरी केली आहे. चौथ्या सामन्यात त्याने ‘पॉवर-प्ले’मध्ये आणि त्यानंतरही भेदक मारा करीत फलंदाजांना जखडून ठेवले होते.’’

धोनी-श्रीनिवासन भेट
चेन्नई : भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची त्यांच्या निवासस्थानी शुक्रवारी सकाळी भेट घेतली. या दोघांमध्ये तब्बल ४५ मिनिटे चर्चा झाली असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. श्रीनिवासन यांच्या इंडिया सिमेंट या कंपनीने आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज हा संघ विकत घेतला होता. त्यानंतर जावई गुरुनाथ मयप्पन आणि हितसंबंधांच्या आरोपांमुळे चेन्नईच्या संघाचे दोन वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे.