धोनीची क्रिकेटच्या मैदानात जेवढी लोकप्रियता आहे तितकेच मैदानाबाहेरही धोनीच्या नावाला खूप ‘भाव’ आहे. क्रिकेटमधील विक्रमी कामगिरीसोबतच जाहिरात विश्वातही सर्व क्रिकेटपटूंना मागे टाकणाऱ्या ‘कॅप्टन कूल’ला नुकतेच गुरूग्राममधील एका बिल्डरने तब्बल १.५ कोटींचा फ्लॅट गिफ्ट म्हणून दिला. येथील एलन ग्रुप या इस्टेट डेव्हलपरने धोनीला एक फ्लॅट गिफ्ट दिला आहे. याशिवाय, बिल्डर त्याच्या प्रोजेक्टमध्ये क्रिकेटपटूंना समर्पित असा एक संपूर्ण मजला तयार करणार असल्याचेही समजते. या प्रोजेक्टमध्येच समाविष्ट असणारा धोनी हा पहिला क्रिकेटपटू आहे.

”धोनी एक सच्चा खेळाडू असून क्रिकेटविश्वात देशासाठी त्याने खूप मोठी कामगिरी केली आहे. भारतीय क्रिकेटला धोनीने दिलेल्या योगदानाचा एलन ग्रुपला आदर आहे. याचीच दखल घेऊन ‘एलन मिरॅकल’मध्ये एक सर्व्हिस अपार्टमेंट धोनीला गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला.”, असे एलन ग्रुपचे संचालक रविश कपूर यांनी सांगितले.

गुरूग्राम येथे द्वारका एक्स्प्रेसवे जवळ सेक्टर-८४ मध्ये तब्बल ७ एकर जागेवर एलन ग्रुपचा ‘एलन मिरॅकल’ हा प्रोजेक्ट उभारला जात आहे. धोनीला गिफ्ट म्हणून देण्यात येणारा फ्लॅट १,००० चौरस फुटांचा आहे.