ट्वेन्टी-२० मालिकेत रविवारी ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्याच भूमीत चारीमुंड्या चीतपट केल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ड्रेसिंग रूममध्ये प्रोत्साहनपर भाषण केले. आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात विजयाची हीच लय कायम ठेवा, असा सल्ला यावेळी धोनीने भारतीय संघातील खेळाडुंना दिला. सूत्रांच्या माहितीनुसार कालचा सामना संपल्यानंतर महेंद्रसिंग धोनी ड्रेसिंग रूममध्ये तब्बल २० मिनिटे भाषण देत होता. यावेळी धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा मालिकाविजय भारतासाठी खूपच महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या भूमीत त्यांच्याचविरुद्ध कधीही अशाप्रकारे खेळला नव्हता. भारतीय फलंदाज सध्या सर्वोत्कृष्ट खेळ करत असून तुमच्यापैकी सर्वांनाच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या निर्भेळ यशाचे महत्त्व माहित आहे. संघातील काही खेळाडुंनी पहिल्यांदाच इतके भव्यदिव्य यश पाहिले असेल, त्यांनी या मालिकाविजयाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे, असे महेंद्रसिंग धोनीने म्हटले. मायदेशातील आगामी ट्वेन्टी-२० मालिकेत श्रीलंकेविरुद्ध आणि आशिया चषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध विजयाची हीच लय कायम ठेवा, असा सल्ला धोनीने यावेळी दिला. संघातील खेळाडुंनी हाच आत्मविश्वास कायम राखावा, असेदेखील धोनीने यावेळी म्हटले. एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर ट्वेन्टी-२० मालिकेतील हे यश धोनीच्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीच्यादृष्टीनेही महत्त्वाचे असल्याचे मानले जात आहे.
यावेळी भारतीय संघाचे संचालक रवी शास्त्री यांनीदेखील छोटेसे भाषण केले. शास्त्रींनी खेळाडुंच्या जिद्दीचे कौतूक करत भारताच्या महान खेळाडुंना जे जमले नाही, ते तुम्ही साध्य करून दाखवल्याचे म्हटले. भारतीय खेळाडुंनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिले. भारतीय संघाने यापूर्वी असा खेळ कधीच केला नव्हता. भारतीय संघाकडे आजवर उपखंडात चांगला खेळणारा संघ यादृष्टीनेच पाहिले जात होते. मात्र, तु्मच्यामुळे तो दृष्टीकोन बदलल्याचे शास्त्री यांनी सांगितले.